विमानात १३ वर्षीय मुलाच्या मांडीवर गरम चहा सांडला; एअरलाईन्सकडून मिळाले ५८ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 02:07 PM2021-04-20T14:07:50+5:302021-04-20T14:08:12+5:30
आयरलँडमध्ये राहणारा एमरे कराक्यासोबत डुबलिनहून इस्तानबुल जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एक अपघात घडला होता
आयरलँडमध्ये राहणाऱ्या एका युवकासोबत ४ वर्षापूर्वी अशी घटना घडली होती ज्यानंतर त्याच्या आईने एअरलाईन्स कंपनीच्याविरोधात खटला दाखल केला होता. आता या घटनेवर कोर्टाने निर्णय सुनावला आहे. कोर्टाने एअरलाईन्स कंपनीला युवकाच्या झालेल्या दुखापतीबद्दल त्याला नुकसान भरपाई म्हणून मोठी रक्कम देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ४ वर्षानंतर युवक मालामाल झालेला आहे.
आयरलँडमध्ये राहणारा एमरे कराक्यासोबत डुबलिनहून इस्तानबुल जाणाऱ्या फ्लाईटमध्ये एक अपघात घडला होता. आयरलँडच्या वॉटरफोर्ड येथे वास्तव्यास असणाऱ्या एमरेने दावा केला आहे की, त्याच्या डाव्या पायावर फ्लाईटमधील केबिन क्रू सदस्याने गरम चहाचा कप सांडला होता. त्यामुळे त्याच्या पायावर एक डाग तयार झाला. ४ वर्षापूर्वी घडलेल्या या घटनेमुळे एमरे खूप घाबरला होता. खूप दिवस त्याला याचा त्रास सहन करावा लागत होता.
जेव्हा ही घटना घडली तेव्हा एमरेचं वय १३ वर्ष होतं. जेव्हा एमरेसोबत घडलेली घटना त्याच्या आईला माहिती पडली. तेव्हा तिने टर्किस एअरलाईन्सविरोधात कोर्टात खटला दाखल केला. एमरेच्या आईने असं सांगितलं की, या घटनेमुळे माझ्या मुलावर मानसिक आणि शारिरीक गंभीर परिणाम झाले. मुलाची जखम बरी होण्यासाठी ३ ते ४ आठवडे लागले. परंतु त्याच्या शरीरावर लागलेला तो डाग अद्यापही कायम आहे.
एमरेची अवस्था इतकी बिकट होती की त्याला प्लास्टिक सर्जनकडे घेऊन जावं लागलं. डॉक्टरांच्या मते, त्याच्या पायावरील तो डाग कायमस्वरुपी राहणार आहे असा दावा आईने कोर्टात केला. त्यानंतर कोर्टाने या प्रकरणावर सुनावणी करताना टर्किश एअरलाईन्सला घडलेल्या घटनेसाठी जबाबदार धरलं आहे. त्यासोबत एमरे आणि त्याच्या आईला नुकसान भरपाई म्हणून ५६ हजार पाऊंड्स म्हणजे जवळपास ५८ लाख रुपये देण्याचे आदेश कोर्टाच्या न्यायाधीशांनी कंपनीला दिले आहेत.