अमेरिकेत निवृत्त अधिकाऱ्याचे स्वप्न उतरले प्रत्यक्षात; चक्क २ कोटी जिंकले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2022 09:54 AM2022-07-04T09:54:20+5:302022-07-04T09:54:33+5:30
काेलमन यांनी ‘व्हर्जिनिया लाॅटरी’ या कंपनीचे लाॅटरीचे तिकीट घेतले हाेते. त्यासाठी त्यांनी केवळ २ डाॅलर्स माेजले हाेते
हेनरिकाे (अमेरिका) : एखादी व्यक्ती स्वप्नातील संकेतांवरून मिळालेले आकडे लाॅटरीवर लावते आणि चक्क जिंकते. असे प्रकार अनेक चित्रपटांमध्ये पाहिले असतील. मात्र, अमेरिकेतील एका निवृत्त अधिकाऱ्याच्या बाबतीत हा प्रकार खराेखर घडला आहे. अलाेंझाे काेलमन यांनी तब्बल अडीच लाख डाॅलर्स म्हणजे सुमारे १.९७ काेटी रुपये एवढ्या रकमेची लाॅटरी जिंकली.
काेलमन यांनी ‘व्हर्जिनिया लाॅटरी’ या कंपनीचे लाॅटरीचे तिकीट घेतले हाेते. त्यासाठी त्यांनी केवळ २ डाॅलर्स माेजले हाेते. लाॅटरीचा ११ जून राेजी ड्राॅ हाेता. त्यावेळी १३-१४-१५-१६-१७-१८ हे आकडे स्क्रीनवर झळकले आणि १९ हा बाेनस नंबर निघाला. आपल्या तिकिटावर हेच आकडे असल्याचे लक्षात येताच त्यांना सुखद धक्का बसला. ११ जून राेजी ड्राॅ हाेता. त्याचा निकाल गुरुवारी ३० जून राेजी जाहीर करण्यात आला.
कंपनीच्या अधिकाऱ्यांनाही बसेना विश्वास
काेलमन यांनी सांगितले, की मला एक स्वप्नात हे आकडे दिसले हाेते. म्हणून हे ते निवडले. लाॅटरी कंपनीच्या अधिकाऱ्यांचा तर यावर विश्वासच बसत नाही. काेलमन यांनी लाॅटरीचे तिकीट घेताना चार सेटमध्ये आकडे विभागले हाेते. त्यापैकी एका सेटचे आकडे विजयी ठरले.