अबब! २ महिन्यापासून घर बंद होतं; कंपनीनं पाठवलेल्या गॅस बिलाची रक्कम पाहून कुटुंब चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 04:54 PM2022-02-07T16:54:28+5:302022-02-07T16:54:46+5:30
गॅसचं बिल प्राप्त झाल्यानंतर घरमालकाने याबाबत आवाज उचलला होता. त्यानंतर कंपनीनं बिल दुरुस्त केले.
नवी दिल्ली – देशभरात सध्या घरगुती गॅसचे दर महागले आहेत. काही शहरात गॅस सिलेंडरऐवजी पाइप लाइननं गॅस पुरवठा केला जातो. ज्याला पीएनजी गॅस म्हटलं जातं. पीएनजी गॅसचा जितका वापर करु तितकं त्याचे बिल येते. परंतु गुजरातच्या अहमदाबाद येथे एका कुटुंबाला याच बिलाचा नाहक त्रास सहन करावा लागल्याचं दिसून आले. जवळपास २ महिने या बंद असलेल्या घराचं गॅसचं बिल पाहून कुटुंबही हैराण झालं.
गॅसचं बिल प्राप्त झाल्यानंतर घरमालकाने याबाबत आवाज उचलला होता. गॅस कंपनीनं या घरमालकाला तब्बल ४३ हजार ६६८ रुपये बिल पाठवलं. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबाद शहरातील साउथ बोपल या परिसरातील ही घटना आहे. याठिकाणी एका अपार्टमेंट राहणाऱ्या हिना पटेल यांना अलीकडेच डिसेंबर २०२१ आणि जानेवारी महिन्याचं पीएनजी गॅसचं बिल ४३ हजार ६६८ रुपये इतकं आलं आहे.
पटेल यांच्या घरात अदानी टोटल गॅस लिमिटेडचं कनेक्शन आहे. बिलात इतकी मोठी रक्कम पाहून पटेल कुटुंब चक्रावले. त्यांना तातडीने कंपनीला याबाबत तक्रार नोंदवली. त्यानंतर कंपनीनं तक्रारीनंतर बिलात दुरुस्ती केली. ज्या अपार्टमेंटमध्ये पीएनजी बिल पाठवलं ते साउथ पार्क येथे आहे. फ्लॅट मालक हिना पटेल म्हणाल्या की, मागील २ महिन्यापासून घर बंद आहे. भाडेकरुने नोव्हेंबर २०२१ ला फ्लॅट रिकामा केला होता. पीएनजीचं बिल पाहून आम्हाला धक्का बसला. शनिवारी याबाबत कंपनीच्या ग्राहक तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणली.
तक्रारीची कंपनीनं घेतली दखल
कंपनीनं म्हटलं की, ३ डिसेंबर २०२१ ते ३० जानेवारी २०२२ या कालावधीत घरातील पीएनजीमध्ये २९.५ MMBTU गॅस वापरला गेल्याचं दिसलं. हे बिल १९ फेब्रुवारीपर्यंत भरायचं होतं. माध्यमाकडे आलेले बिल पहिल्या महिन्यापासून गॅस वापरल्याचं दिसून येते. घरमालकाने जून आणि डिसेंबर या काळात ०.२६६ एमएमबीटीयू आणि ०.८७ एमएमबीटीयू पीएनजी गॅस वापरल्याचं दिसून येते. त्यामुळे कंपनीनं या बिलात दुरुस्ती केली आहे.