न्यायाधीशांनी तिला दिली अनोखी शिक्षा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:27 AM2023-12-18T08:27:22+5:302023-12-18T08:27:44+5:30
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ओहायो या राज्यातील पर्मा नावाच्या शहरात रोझमेरी हेंयन नावाची एक ३९ वर्षीय महिला एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. त्यावेळी तिला तिथं आलेला अनुभव आवडला नाही.
एवढ्या-तेवढ्या गोष्टींवरून चिडणं हा माणसाचा स्वभाव आहे. तसंच आपल्यापेक्षा खालच्या सामाजिक स्तरावर असलेल्या व्यक्तीशी अरेरावीनं वागणं हेही अनेक माणसं करताना दिसतात. हे दोन्हीही मनुष्यस्वभाव असल्यामुळं जगभरात सगळीकडंच माणसं कमी- अधिक प्रमाणात या प्रकारानं वागताना दिसतात. मात्र, काही ठिकाणी या वागण्याला समाजमान्यता असते, तर काही ठिकाणी मात्र या वागण्याला असभ्यपणा समजलं जातं. इतकंच नाही, तर काही ठिकाणी या प्रकारच्या वागण्यासाठी कायदेशीर शिक्षाही होऊ शकते.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील ओहायो या राज्यातील पर्मा नावाच्या शहरात रोझमेरी हेंयन नावाची एक ३९ वर्षीय महिला एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. त्यावेळी तिला तिथं आलेला अनुभव आवडला नाही. त्यामुळं ती तेथील चिपोटले बनवणाऱ्या एमिली रसेल नावाच्या महिलेला अद्वातद्वा बोलली. इतकंच नाही, तर तिनं तो चिपोटलेचा गरम बाउल एमिली रसेलच्या तोंडावर फेकून मारला. इतर एखाद्या देशात कदाचित या घटनेकडं दुर्लक्ष केलं गेलं असतं, रोझमेरीला समज देऊन सोडून देण्यात आलं असतं; पण अमेरिकेत मात्र तेथील पद्धतीप्रमाणं रोझमेरी हेंयनवर रीतसर खटला भरण्यात आला. तिची केस जज टिमोथी गिलियन यांच्यासमोर चालविण्यात आली. टिमोथी गिलियन हे पर्मा कोर्टातील एक ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. ते म्हणतात, की या प्रकारच्या वागण्याच्या केसेस आमच्याकडं अधूनमधून येत असतात. त्यातल्या बहुतेक सगळ्या केसेसना तेथील कायद्याप्रमाणं ९० दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते; पण रोझमेरी हेंयनच्या बाबतीत थोडी वेगळी घटना घडली. चार मुलांची आई असलेल्या रोझमेरीनं तिला सर्व्ह केलेले चिपोटले ‘दिसायला घाणेरडे आहेत’ या कारणानं ते आणून देणाऱ्या एमिली रसेलच्या तोंडावर फेकून मारले. जेव्हा तिची केस कोर्टात गेली त्यावेळी मात्र रोझमेरीनं लगेच तिचा गुन्हा कबूल केला.
जज गिलियन म्हणतात त्याप्रमाणं तिला तिच्या वागण्याचा खरोखरच पश्चात्ताप झाला आहे असं वाटत होतं. रोझमेरीला अजून तरी कुठली नोकरी मिळालेली नाही. त्यामुळं कदाचित तिनं त्यावेळी रागाच्या भरात हे कृत्य केलेलं असू शकतं. मात्र, या आधी तिच्यावर कुठल्याही गुन्ह्याचा आरोप नव्हता. तिची त्याआधीची वागणूक पूर्णतः कायद्याला धरून होती आणि म्हणूनच जज गिलियन यांना असं वाटलं, की त्याक्षणी संताप अनावर झालेल्या व्यक्तीनं केलेलं हे कृत्य आहे. तिला आपण काय शिक्षा देतो, यावर तिचं पुढचं भविष्य अवलंबून आहे. शिवाय तिनं गुन्हा कबूल करून पश्चात्तापही व्यक्त केला होता. त्यामुळं ९० दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्याआधी जज गिलियन यांनी रोझमेरीला एक पर्याय दिला. तिनं एक तर ९० दिवस तुरुंगात राहावं किंवा ६० दिवस एखाद्या फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये काम करावं. असे दोन पर्याय दिल्यावर रोझमेरीनं ९० दिवस तुरुंगात राहण्याऐवजी एखाद्या फास्ट फूड जॉइंटमध्ये काम करण्याचा पर्याय स्वीकारला. जज टिमोथी गिलियन म्हणतात, ‘नागरिकांनी कराच्या रूपानं दिलेल्या पैशातून तुरुंग चालवले जातात. ते
पैसे खर्च करून रोझमेरीला ९० दिवस तुरुंगात खाऊ घालण्यापेक्षा तिला लोकांशी सहानुभूतीनं वागणं शिकवायला काय हरकत आहे, असं मला वाटलं.’
अर्थात, फास्ट फूड जॉइंटमधलं काम हे शिक्षेचा एक भाग असल्यामुळं रोझमेरीला तिचं नेहेमीचं काम करून शिवाय आठवड्याला २० तास हे काम करावं लागणार आहे आणि तरीही जज गिलियन यांनी तिची शिक्षा पूर्णपणे माफ केलेली नाही. तिला ३० दिवस तुरुंगात काढावेच लागणार आहेत. रोझमेरीला मिळालेली शिक्षा ऐकून एमिली रसेलनं आनंद व्यक्त केला. त्या फास्ट फूड जॉइंटमध्ये रोझमेरीला चिपोटलेचा बाउल आणून देणारी एमिली ही केवळ १७ वर्षांची तरुण मुलगी आहे. रोझमेरीला कुठलीतरी नाममात्र किरकोळ शिक्षा करून सोडून न देता फास्ट फूड जॉइंटमध्येच काम करायला लावलं, हे योग्य केलं, असं तिला वाटतं. रोझमेरीला झालेली शिक्षा ही कायद्याच्या चौकटीपेक्षा काहीशी बाहेर आहे. मात्र, कदाचित तीच शिक्षा जास्त परिणामकारक ठरेल.
तिला ‘चांगला’ धडा मिळेल!
तुरुंगात ९० दिवस राहण्यापेक्षा एखाद्या लहान फास्ट फूड जॉइंटवर काम करणारे लोक कुठल्या परिस्थितीतून येतात, त्यांच्याशी इतर लोक कसे वागतात, आपण त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, याचा चांगला धडा रोझमेरीला या शिक्षेतून मिळेल. जज गिलियन म्हणतात त्याप्रमाणं ती कदाचित इतर लोकांशी अधिक सहानुभूतीनं वागायला शिकेल आणि तसं झालं, तर ही शिक्षा पूर्णपणे सत्कारणी लागेल. कारण वर्तणुकीत सकारात्मक बदल हाच शिक्षेतून अपेक्षित असलेला परिणाम असतो.