मृत्यू मागणारा जगातला सर्वांत खतरनाक रस्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 08:29 AM2022-05-12T08:29:39+5:302022-05-12T08:29:44+5:30

जगात अशाही काही जागा आहेत, ज्या मुळातच अतिशय धोकादायक आहेत. उदाहरणार्थ जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट.

The most dangerous road in the world asking for death | मृत्यू मागणारा जगातला सर्वांत खतरनाक रस्ता

मृत्यू मागणारा जगातला सर्वांत खतरनाक रस्ता

Next

आपल्या आयुष्यात थ्रिल असावं, रोमांच असावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. त्यामुळे अनेक जण कुठली ना कुठली साहसं करीत असतात. त्यात अर्थातच तरुणांचा भरणा अधिक असतो. संकटांशी दोन हात करायला त्यांना नेहमीच आवडतं. त्यात प्रसंगी जीव गेला तरी त्यांना त्याचं सोयरसुतक नसतं. 

शिवाय जगात अशाही काही जागा आहेत, ज्या मुळातच अतिशय धोकादायक आहेत. उदाहरणार्थ जगातलं सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट. हे शिखर सर करण्याची ईर्षा मनात धरून जगभरातले अनेक जण तिथे जातात. प्रसंगी त्यांना आपला प्राणही गमवावा लागतो, तरीही तिथे जाणाऱ्यांची संख्या घटलेली नाही. अर्थात एव्हरेस्टवर आपण गेलंच पाहिजे अशी सक्ती कोणावरच नाही, पण जगातल्या काही जागा, रस्ते असे आहेत, तिथे जाण्याशिवाय अनेकांना पर्याय नाही. अशीच एक जागा आहे ती म्हणजे ‘डेथ रोड’! 
बोलिविया या देशात ६९ किलोमीटर लांबीचा ‘नॉर्थ युंगास रोड’ हा जगातला सर्वांत खतरनाक रस्ता मानला जातो. कारण आजवर या ठिकाणी सर्वाधिक अपघात झाले आहेत आणि अजूनही अपघातांची संख्या कमी झालेली नाही. या रस्त्यावरून वाहन घेऊन जाणं म्हणजे अक्षरश: जीव मुठीत घेऊनच जावं लागतं. १९३० मध्ये हा रस्ता तयार झाला, पण  गेली कित्येक वर्षे या रस्त्याला पर्यायच नसल्यानं या रस्त्याचा वापर करणं अनिवार्य होतं. २००६मध्ये या रस्त्याला पर्यायी रस्ता तयार झाला असला, तरीही मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. आज इतक्या वर्षांनीही हा रस्ता जगातला सर्वांत खतरनाक रस्ता आहे. 

डोंगरात कोरलेला, तब्बल दोन हजार फूट उंचीवर असलेला हा रस्ता अनेक संकटांनी भरलेला आहे. इथे कायम धुकं असतं, दरडी कोसळत असतात, पावसाळ्यात छोटे-मोठे धबधबे खाली कोसळत असतात, त्यामुळे निसरडा झालेला हा रस्ता असाही निसरडा आणि प्रचंड उताराचा आहे. रस्त्यावर अनेक ठिकाणी ‘ब्लाइंड’ वळणं आहेत. एका वेळी एकच वाहन कसंबसं जाऊ शकतं. असं असतानाही एकमेकांना खेटून दुहेरी वाहतूक आतापर्यंत करावी लागत होती. त्यात वाहनावरचा कंट्रोल थोडासाही गेला, गाडीचं चाक थोडंसं घसरलं, माती सरकली, चाकाखाली एखादा दगड आला, की सगळं काही घेऊन दोन हजार फूट खाली कपाळमोक्ष ठरलेला. याशिवाय गाड्यांवर वरून कडे कोसळणं, कितीही उत्तम ड्रायव्हर असला, तरीही अशा भीतीदायक ठिकाणी आत्मविश्वासाच्या ठिकऱ्या उडणं. यामुळे हा ‘डेथ रोड’ कायमच मृत्यूचा सापळा बनलेला असतो. याशिवाय निसरड्या रस्त्यावरून वाहन स्लीप होणं, वाहन ओव्हरलोड होणं या कारणांनीही अनेक वाहनं थेट दरीच्या तळाशी विसावतात. 

आज इतक्या वर्षांत या ठिकाणी अनेक सुधारणाही केलेल्या आहेत, तरीही मुळातच लोकांच्या प्राणांसाठी आसुसलेला हा रस्ता आजही दरवर्षी किमान तीनशे ते चारशे जणांचं आयुष्य कायमचं संपवतो! अनेक जण पर्याय नाही म्हणून या रस्त्याचा वापर करतात, तर काही जण आव्हानांची आपली खुमखुमी जिरवण्यासाठी म्हणून मुद्दाम या रस्त्याच्या वाटेला जातात आणि मृत्यूवर स्वार होण्याचा प्रयत्न करतात. 
यात जगभरातल्या सायकलिस्टस्चा मोठा वाटा आहे. इतक्या प्रचंड उंचीवर आणि उतारावर सायकल चालवण्याचा हा थरार पाहाणाऱ्याच्याही हृदयाचे ठोके थांबवणारा असतो, पण या ‘डेथ रोड’वर राइड करूनही जिवंत राहता येतं हे दाखवण्याचा हव्यास असलेल्या सायकलिस्टस्ची गर्दी इथे दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे इतर वाहनांपेक्षाही सायकलिस्टस्च्या मृत्यूंसाठीही सध्या हा रस्ता ओळखला जातो. 

  १९३० मध्ये पॅराग्वे आणि ब्राझील यांच्यात झालेल्या ‘चाको’ युद्धात पॅराग्वेच्या कैद्यांकडून हा रस्ता तयार करून घेण्यात आला होता. त्यांनी डोंगर खोदून हा रस्ता तयार केला होता. बोलिव्हियाची राजधानी ला पेज ते कोरोइको या शहरांदरम्यान  हा रस्ता आहे. तो हळूहळू चढत चार हजार फुटापर्यंत जातो आणि त्यानंरचा चढ, तर अगदी छातीवर म्हणजे १५,२६० फुटापर्यंत जातो. विशेषत: लाकूड आणि अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी या रस्त्याचा वापर अनिवार्य होता. मुंगीच्या पावलापेक्षाही हळू जाणाऱ्या, धापा टाकणाऱ्या वाहनांच्या रांगा अनेक वाहनं अर्धी दरीत आणि अर्धी डोंगराच्या कडेवर अधांतरी लटकलेली.. हे इथलं नेहेमीचं दृश्य आहे. ज्यांच्या आयुष्याची दोरी बलवत्तर, त्यांनी या परिस्थितीतही पुनर्जन्म घेतला आहे, तर काही जणांचं आयुष्य कायमचं संपलं आहे; पण हाच थरार अनुभवण्यासाठी अनेक जण या ‘डेथ रोड’वर मुद्दाम आयुष्य पणाला लावत असतात.. 

जगातले खतरनाक रक्तरंजित रस्ते!
जगातले असेच आणखी काही रस्ते आहेत, जे कायमच मृत्यूची मागणी करीत असतात. त्यातला पहिला रस्ता आहे, जलालाबाद ते काबूल हा ६५ किलोमीटरचा रस्ता. दुसरा रस्ता आहे, इराकमधला ‘डेथ हायवे’. तिसरा रस्ता आहे पाकिस्तान आणि चीन सीमेवरील काराकोरम रस्ता आणि चौथा रस्ता आहे, चीनमधील गुओलिआंग टनेल. जगातले हे खतरनाक रक्तरंजित रस्ते कायमच माणसाच्या रक्ताची मागणी करीत असतात.

Web Title: The most dangerous road in the world asking for death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.