जगातली सगळ्यात महागडी भाजी, एक किलोच्या किमतीत येईल एवढं सोनं, असं आहे खास वैशिष्ट्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2023 09:11 PM2023-03-29T21:11:19+5:302023-03-29T21:12:10+5:30
Most Expensive Vegetable: तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे.
गेल्या काही काळापासून सातत्याने वाढत असलेल्या महागाईमुळे भाजीपाल्याचे दर कडाललेले आहेत. त्यामुळे अनेकांचं दैनंदिन बजेट बिघडलं आहे. मात्र जगातील सर्वात महाग भाजी कोणती हे तुम्हाला माहिती आहे का. आता तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. जगातील सर्वात महागड्या भाजीचं नाव हॉप शूट्स असं आहे. ही एक किलो
भाजी खरेदी करण्यासाठी लागणारी किंमत ऐकून तुम्ही अवाक् झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक किलो हॉप शूट्स खरेदी करण्यासाठी तुम्हाला जेवढे पैसे मोजावे लागतील तेवढ्या किमतीमध्ये तुम्ही सुमारे १५ तोळे सोनं खरेदी करू शकता. हो एक किलो हॉप शूट्स भाजी खरेदी करण्यासाठी तब्बल ८ हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे ही भाजी खरेदी करणे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचे आहे. अशी भाजी खरेदी करणे आणि खाण्याचं स्वप्न केवळ धनाढ्य लोकच पाहू शकतात.
ही भाजी जगातील विशिष्ट भागातच तयार होते. अमेरिका आणि य़ुरोपमध्ये हॉप शूट्सला रुजवणे वाढवणे आणि तोडणे हे खूप जिकीरीचे काम मानले जाते. त्यामुळेच या भाजीची किंमत ही खूप जास्त आहे. भारताता हॉप शूट्स भाजीचं उत्पादन होत नाही. हिमाचल प्रदेशमध्ये ही भाजी रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्याला यश मिळाले नाही. या भाजीमध्ये अनेक औषधीय गुणधर्म असतात. हॉप शूट्सच्या फुलाला हॉप कोन्स म्हणतात. या फुलाचा वापर बिअर बनवण्यासाठी केला जातो. फांद्या आणि पानांची भाजी केली जाते..
ही भाजी म्हणजे एक पर्वतीय रोप आहे. युरोप आणि उत्तर अमेरिकेतील लोकांनी याचे औषधी गुण कळल्यावर त्याची शेती सुरू केली. या भाजीचं शास्त्रीय नाव Humulus lupulus असं आहे. या भाजीचं रोप सहा मीटरपर्यंत वाढू शकतं. तसेच २० वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतं. हॉप शूट्स एवढी महाग असण्याचं कारण म्हणजे ती रुजवण्यासाठी खास वातावरणाची गरज असते. ती कुठेही उत्पादित होत नाही. या भाजीच्या उत्पादनावरही खूप पैसे खर्च होतात.
एका रिपोर्टनुसार हॉप शूट्सचा सध्याचा जागतिक बाजारातील व्यवसाय हा ८.१ बिलियन डॉलर एवढा आहे. हॉप शूट्सचा बाजार वार्षिक ४.६ टक्के सीएजीआर ने वाढत आहे. तसेच २०३० पर्यंत तो १५.१ बिलियन डॉलरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.