भारतातील एकमेव 'असा' जिल्हा, जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात; वाचा रंजक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2023 01:22 PM2023-10-15T13:22:58+5:302023-10-15T13:23:46+5:30
निसर्गसौंदर्यामुळे आणि डोंगराळ पर्वतीय रांगामुळे हे पर्यटन स्थळ पाहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्राला 'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ असं नाव दिलं.
नवी दिल्ली – भारताची भौगोलिक रचना पाहिली तर अनेक रंजक गोष्टी समोर येतात. आपण नेहमी देशाच्या भूगोलाबाबत पुस्तकांमध्ये आणि शाळांमध्ये वाचलं असेल. कोणत्या राज्याची सीमा एकमेकांना जोडल्या आहेत. कोणती नदी कुठल्या राज्यातून वाहते हे सगळे वाचायला मिळते. परंतु आज आम्ही तुम्हाला एका अशा जिल्ह्याबाबत सांगणार आहोत जिथं ४ राज्यांच्या सीमा लागतात. हा देशातील एकमेव जिल्हा आहे ज्याचं नाव पंतप्रधान जवाहरलाल नेहरुंनी 'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ ठेवलं होतं' तुम्हालाही या जिल्ह्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता लागली असेल तर चला माहिती करून घेऊ.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्हा, ज्याला ४ राज्यांच्या सीमा जोडल्या आहेत. या राज्यांमध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंड यांचा समावेश आहे. या ४ राज्यांच्या सीमा सोनभद्र जिल्ह्याला जोडलेल्या आहेत. विंध्य आणि कैमूर टेकड्यांमध्ये वसलेला हा जिल्हा खनिजांनी वेढलेला आहे. क्षेत्रफळाबद्दल बोलायचं झालं तर खीरी नंतर हा उत्तर प्रदेशातील दुसरा सर्वात मोठा जिल्हा मानला जातो.
सोनभद्र जिल्ह्याची लोकसंख्या १५ लाखाच्या आसपास आहे. सोनभद्र हे नाव सोन नदीमुळे पडले. सोन नदीच्या किनारी वसलेला हा जिल्हा आहे. सोन नदीशिवाय रिहिंद, कनहर, पांगन इत्यादी नद्याही सोनभद्र जिल्ह्यातून जातात. सोनभद्र जिल्ह्याची स्थापना १९८९ मध्ये करण्यात आली होती. मिर्झापूर जिल्ह्यातून काही गावे वगळून सोनभद्र हा नवीन जिल्हा तयार करण्यात आला. औद्योगिक क्रांतीसाठी हा जिल्हा महत्त्वाचा आहे. या जिल्ह्यात प्रामुख्याने खनिज पदार्थ, वीज उद्योगाशी निगडीत अनेक कामे पाहायला मिळतात.
पंतप्रधान नेहरूंनी म्हटलं होतं, 'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’
सोनभद्र हे विंध्य आणि कैमूर पर्वतरांगांच्या मध्यभागी वसलेले आहे. निसर्गसौंदर्यामुळे आणि डोंगराळ पर्वतीय रांगामुळे हे पर्यटन स्थळ पाहून देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सोनभद्राला 'स्वित्झर्लंड ऑफ इंडिया’ असं नाव दिलं. पंडित नेहरू १९५४ मध्ये एका सिमेंट कारखान्याच्या उद्घाटनासाठी सोनभद्रला आले होते, त्यावेळी ते सोनभद्रचं सौंदर्य पाहून खूप प्रभावित झाले. सोनभद्रला एनर्जी कॅपिटल ऑफ इंडियाही म्हटलं जाते, कारण येथे सर्वाधिक पॉवर प्लांट प्रकल्प आहेत.