भावा, नशीब असावं तर 'असं'; १३ महिन्यात दोनदा जिंकली ६ कोटींची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 02:15 PM2022-10-27T14:15:58+5:302022-10-27T14:16:10+5:30
ओंटारियो येथील मिल्टन येथे राहणाऱ्या अँटोनी बियानी यांनी २३ सप्टेंबर रोजी लोटो मॅक्ससाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले.
ओटावा - जर नशिबानं एकदा साथ दिली तर त्याचे आयुष्यच बदलून जाते. या जगात लॉटरी खेळण्याच्या नादात अनेकजण उद्ध्वस्त झाले, त्यांचे घर विकले गेले, संसार मोडला पण एक व्यक्ती अशी आहे की ज्याला १३ महिन्यांत दोनदा ६-६ कोटींची लॉटरी लागली. नशिबाची ही कहाणी, कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील अँटोनी बियानी यांची आहे.
२३ सप्टेंबर रोजी लॉटरीचे तिकीट खरेदी केले
ओंटारियो येथील मिल्टन येथे राहणाऱ्या अँटोनी बियानी यांनी २३ सप्टेंबर रोजी लोटो मॅक्ससाठी लॉटरीचे तिकीट खरेदी केले. त्याने हे तिकीट मिल्टनमधील मेन स्ट्रीटवरील मिल्टन कन्व्हिनियन्स स्टोअरमधून खरेदी केले. ओंटारियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशनने एका निवेदनात म्हटलं आहे की, बियानी यांना समजलं की त्यांना १० लाख कॅनेडियन डॉलर (अंदाजे ६ कोटी रुपये) लॉटरी जिंकली आहे तेव्हा ते हैराण झाले. १३ महिन्यांपूर्वी लॉटरीत त्यांनी एवढीच रक्कम जिंकली होती.
पैशांचा कसा वापर करणार?
ओंटारियो लॉटरी आणि गेमिंग कॉर्पोरेशनच्या अधिकार्यांशी बोलताना बियानी म्हणाले की, माझा यावर अजिबात विश्वास बसत नव्हता. हे पहिल्यांदा जिंकण्यापेक्षाही हैराण करणारं होतं. ही बातमी मी माझ्या पत्नीला सांगितली तेव्हा तिलाही खूप आनंद झाला. या सर्व पैशातून तो आपल्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकेल. या पैशातून मला माझ्या कुटुंबातील पुढच्या पिढीचे जीवन थोडे सोपे करायचे आहे अशी प्रतिक्रिया बियाणी यांनी दिली.