४१ वर्षे जुन्या केकची किंमत? १५,८६२ रुपये...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2022 09:23 AM2022-10-24T09:23:03+5:302022-10-24T09:23:11+5:30
डायना यांचा जन्म १ जुलै १९६१ रोजी झाला. १४ फेब्रुवारी १९८१ रोजी चार्ल्स आणि डायना यांचा साखरपुडा झाला, तेव्हा डायना खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या.
राजकुमारी डायना यांचं सारं आयुष्य एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नव्हतं. राजकुमारी डायना नुसत्या सुंदरच नव्हत्या, तर ब्रिटनच्या सर्वसामान्य नागरिकांच्याही त्या आवडत्या होत्या. त्यांचं सारं आयुष्यच एखाद्या परिकथेसारखं होतं. राजकुमारी डायना खरं तर अत्यंत सर्वसामान्य घरातल्या, पण किंग चार्ल्स यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर अख्ख्या जगभरात त्या चर्चेचा विषय ठरल्या. रॉयल फॅमिलीचा त्या अविभाज्य भाग झाल्या. त्यांना मिळालेलं ग्लॅमर, त्यांच्या दोस्तीच्या कहाण्या, त्यांचं प्रेम, त्यांची एखादी छबी टिपण्यासाठीही त्यांच्या मागावर असलेले पापाराझी, त्यांचं आयुष्य आणि त्यांचा अपघाती मृत्यू या सगळ्याच गोष्टी संपूर्ण जगभरात अजरामर होऊन राहिल्या आहेत.
डायना यांचा जन्म १ जुलै १९६१ रोजी झाला. १४ फेब्रुवारी १९८१ रोजी चार्ल्स आणि डायना यांचा साखरपुडा झाला, तेव्हा डायना खऱ्या अर्थानं चर्चेत आल्या. साखरपुड्यात चार्ल्स यांच्याकडून त्यांना मिळालेल्या अंगठीची किंमत त्यावेळी तीस हजार पाऊंड होती. त्यात एक नीलम रत्न आणि १४ हिरे जडवलेले होते. २९ जुलै १९८१ रोजी चार्ल्स यांच्याबरोबर डायना यांचा विवाह झाला, त्यावेळी त्यांचं वय अवघं वीस वर्षांचं होतं. लक्षावधी लोकांना हा विवाहसोहळा टीव्हीवर पाहिला होता.
किंग चार्ल्स आणि डायना यांचा विवाह इतक्या थाटामाटात झाला होता की या विवाहाला आजही 'वेडिंग ऑफ द सेंच्युरी' म्हटलं जातं. त्यांच्या विवाहाला आता तब्बल ४१ वर्षे उलटली आहेत, डायनाचा तर मृत्यूही झाला, तरीही या विवाहाच्या आठवणी अनेकांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्यातलीच एक कहाणी म्हणजे त्यांच्या लग्नाचा शाही केक! त्याच लग्नाचा केक; खरं तर त्या शाही केकचा एक तुकडा आज संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय झाला आहे. त्याची कहाणीही तशीच हटके आहे. चार्ल्स आणि डायना यांच्या या अविस्मरणीय विवाह सोहळ्याला जगभरातले अतिशय नामांकित असे तीन हजारांपेक्षाही जास्त पाहुणे हजर होते. जे या विवाह सोहळ्याला हजर होते, ते आजही हा सोहळा आणि त्या सोहळ्यातील शाही सन्मान विसरले नाहीत. त्यातीलच आणखी एक अनोखा प्रकार होता, तो म्हणजे या सोहळ्यात हजर असलेल्यांना वाटला गेलेला केक आलेल्या सर्व पाहुण्यांना या विवाहानिमित्त तयार करण्यात आलेल्या एका भल्यामोठ्या शाही केकचे तुकडे वाटण्यात आले होते. हा केक चाखणारे सांगतात, त्याची चव आजही आमच्या जिभेवर रेंगाळते आहे आणि ती चव आम्ही विसरलेलो नाही.
जमलेल्या नामांकित पाहुण्यांमध्ये एक अतिशय आगळावेगळा पाहुणा होता. त्याचं नाव निगेल रिकेट्स, अर्थातच त्यांनाही हा शाही केक मिळाला होता. जमलेल्या एकूण एक पाहुण्याने आपल्या वाटेचा हा शाही केक तिथल्या तिथे चाटूनपुसून संपविला, पण निगेल महाशयांनी मात्र हा केक न खाता जपून ठेवला, चार्ल्स आणि डायना यांच्या विवाहाचा हा केक त्यांच्यासाठी अनोखा ठेवा होता. त्यांनी केकचा हा तुकडा किती काळ जपून ठेवावा? गेल्या वर्षी त्यांचं निधन झालं. तरीही तो केक जसाच्या तसा होता. निगेल यांच्या निधनानंतर आता काही दिवसांपूर्वी या केकचं रहस्य खुलं झालं आहे. निगेल यांनी इतकी वर्ष हा केक नुसता सांभाळलाच नाही, तर त्याचं निगुतीनं संरक्षणही केलं होतं, हे नुकतंच उघड झालं आहे. या केकच्या तुकड्याचा नुकताच लिलाव झाला.
ब्रिटिश राजघराण्यातल्या, त्यातही आजवरच्या सर्वाधिक चर्चेच्या लग्नातील आणि शिवाय तब्बल ४१ वर्षे जुन्या या केकला आता ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं आहे. मूळ बॉक्समध्येच हा केक पॅक करण्यात आला होता. डोर अॅण्ड रीस या वेबसाइटतर्फे या केकची विक्री करण्यात आली. लिलावापूर्वी या केकची बेस प्राईस तीनशे पाऊंड (सुमारे २७ हजार रुपये) ठेवण्यात आली होती. अर्थातच यापेक्षा कितीतरी अधिक पटीनं या केकची विक्री होईल, असा अंदाज होता तो मात्र खोटा ठरला, कारण लिलावात या केकला मिळाले एकशे सत्तर पाऊंड, म्हणजे १५,८६२ रुपये! २०१४ मध्ये याच केकच्या एका स्लाइसचा लिलाव करण्यात आला होता. त्यावेळी या स्लाइसला १३७५ पाऊंड्स (सुमारे १ लाख २८ हजार रुपये) एवढी रक्कम मिळाली होती.
पाच फुटांचे २३ शाही केक!
खरे तर चार्ल्स आणि डायना यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी २३ भलेमोठे केक बनविण्यात आले होते. निगेल याच्याकडे असलेल्या केकचा जो तुकडा आत्ता लिलावात विकला गेला, तो त्यातील एका केकच्या सेंटरपीस फ्रुटकेकचा तुकडा आहे, असं मानलं जातं. पाच थर असलेले तब्बल पाच फुटी हे केक होते!