जगातील सर्वांत उंच लाकडी इमारतीचं रहस्य; कसं शक्य आहे हे?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 02:35 PM2022-04-27T14:35:48+5:302022-04-27T14:35:55+5:30
‘रॉकेट ॲण्ड टिगेली’ असं या इमारतीचं नाव असून श्मीट हॅमर लासेन या कंपनीनं या इमारतीचं डिझाइन तयार केलं आहे
अनेक इमारतींमध्ये लाकडाचा वापर अनिवार्य असतो. लाकडामुळे त्या इमारतीचं सौंदर्य तर वाढतंच, पण इमारत बांधकामात लाकडाचा वापर त्या इमारतीला एक वेगळं वैशिष्ट्य प्राप्त करून देतो. त्याठिकाणी इतर घटक वापरता येत नाहीत, असं नाही. पण, लाकडाच्या काही विशेष गुणधर्मांमुळे त्या इमारतीची, घराची, बंगल्याची उपयुक्तताही वाढते. त्यामुळे कोणत्याही बांधकामात दर्जेदार लाकडाचा वापर जितका जास्त, तितकी त्याची किंमतही वाढत जाते. त्यामुळे घरातलं फर्निचर बनवतानाही लाकडाचा आवर्जून विचार आणि वापर केला जातो. लाकडाचं महत्त्व तसं अनन्यसाधारणच, पण सिमेंट काँक्रीट, लोखंड इत्यादी घटकांचा वापर न करता, संपूर्ण लाकडाचीच इमारत बनवली तर? शिवाय ही इमारत आजपर्यंतच्या सर्व लाकडी इमारतींपेक्षा अधिक उंच, अधिक मजले असलेली आणि गगनचुंबी असली तर?..
-सगळ्यांत पहिल्यांदा आपल्या मनात विचार येईल, कसं शक्य आहे हे? संपूर्ण लाकडाची इमारत कशी बांधता येईल? ती किती टिकाऊ असेल? किती काळ टिकेल? लाकडाला कीड लागून संपूर्ण इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली तर? आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे दुर्दैवानं या इमारतीला कधी काळी आग लागलीच आणि कागदासारखी ती भुर्रर्र जळाली तर?..हे सगळे प्रश्न आपल्या मनात कायम असले तरी स्वीत्झर्लंडमध्ये सध्या जगातील सर्वांत मोठी लाकडी इमारत सध्या आकाराला येते आहे. राहण्यासाठी बनवलेली आजपर्यंतची जगातील ही सगळ्यांत मोठी इमारत असेल. शंभर मीटर (३२८ फूट) उंची असलेली ही लाकडाची इमारत येत्या चार वर्षांत म्हणजे २०२६ पर्यंत बांधून पूर्ण होईल. स्वीत्झर्लंडच्या झुरिकजवळील विंटरथुर या शहरात ही इमारत बांधली जात आहे.
‘रॉकेट ॲण्ड टिगेली’ असं या इमारतीचं नाव असून श्मीट हॅमर लासेन या कंपनीनं या इमारतीचं डिझाइन तयार केलं आहे. चार वर्षांनी जेव्हा ही इमारत पूर्ण होईल, तेव्हा ती जगातली सर्वांत उंच लाकडी इमारत असेल. याआधी लाकडी बांधकामं तयार झाली नाहीत, असं नाही, यापेक्षाही उंच अशी ही बांधकामं आहेत, पण ती राहण्यासाठी तयार केलेली नाहीत. यापूर्वीची सर्वात मोठी लाकडी इमारत नॉर्वेमध्ये तयार झाली. या इमारतीची उंची आहे २८० फूट! या इमारतीचं नाव आहे ‘जोस्टारनेट’!
राहण्यासाठी बनवलेल्या जगातील सर्वांत उंच इमारतीचा हा प्रोजेक्ट म्हणजे शेजारी शेजारी उभारलेल्या चार इमारती असतील. प्रत्येक इमारतीचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी केला जाईल. प्रत्येक इमारतीचं डिझाइन वेगवेगळं असेल आणि त्यांची उंचीही! यातल्या काही इमारती लोकांना राहण्यासाठी असतील, काही इमारती खास विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी असतील. त्यात रेस्टॉरण्ट्स असतील, दुकानं असतील, स्काय-बार, स्पा, हिरवळी गालिचा.. असं सारं काही असेल.. ‘रॉकेट ॲण्ड टिगेली’ हा लाकडी प्रकल्प बांधकाम क्षेत्रातील एक आश्चर्य आणि मैलाचा दगड मानला जातोय. केवळ लाकडी इमारती आणि त्यांची गगनचुंबी उंची एवढ्याच कारणामुळे नव्हे, काँक्रीटला पर्याय म्हणून संपूर्णपणे लाकडाचा वापर यात करण्यात आलेला आहे, हे याचं प्रमुख वैशिष्ट्य! स्वीस कंपनी इम्प्लेनिया आणि झुरिक येथील स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ‘इटीएच’ एकत्रितपणे हा प्रकल्प विकसित करणार आहेत.
या इमारतीच्या बांधकामात संपूर्णपणे नव्या आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना काँक्रीटऐवजी लाकडाचा वापर केल्यानं इमारतीचं वजनही खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. याचा फायदा इमारतीची उंची वाढवण्यासाठी तर होईलच, पण ही इमारत इकोफ्रेंडली, पर्यावरणपूरकही असेल. इमारत बांधकामात काँक्रीट, लोखंड यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यानं जगभरात पर्यावरण प्रदूषणाचं प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढतं आहे. जगभरात जे कार्बन उत्सर्जन होतं, त्यात काँक्रीट आणि लोखंड यामुळे होणारं प्रदूषण अनुक्रमे तब्बल आठ आणि पाच टक्के आहे.
जगात सध्या मोठ्या प्रमाणात लाकडी इमारतींचं प्रमाण वाढत आहे. चीनच्या गुईझोई प्रांतात लाकडाची २४ मजली इमारत लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. अमेरिकेच्या मिनेपोलिस येथे लाकडाची १८ मजली इमारत बांधण्यात आली आहे. युरोपातील ऑस्ट्रिया येथे ‘होहो’ नावाचा लाकडी उंच टॉवर उभारण्यात आला आहे. स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथेही लाकडाची उंच इमारत उभी राहिली आहे.
जगातील उंच लाकडी बांधकामं!
जगभरात सध्या जी लाकडी बांधकामं उभी आहेत, त्यात मुहलॅकर रेडिओ ट्रान्समीटर हा टॉवर सगळ्यात उंच मानला जातो. त्याची उंची १९० मीटर (६२० फूट) आहे. त्याचप्रमाणे ग्लीवाइस रेडिओ टॉवर ११८ मीटर (३८७ फूट), थायलंड येथील ‘सँक्चुअरी ऑफ ट्रूथ’ हे मंदिर १०५ मीटर (३४४ फूट) ही काही उंच लाकडी बांधकामं आहेत, पण रूढार्थानं त्या इमारती नाहीत.