'थम्स अप' इमोजी म्हणजे कायदेशीर स्वीकृती! न्यायालयाने ठोठावला ६० लाखांचा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2023 09:41 AM2023-07-09T09:41:36+5:302023-07-09T09:42:07+5:30
बरेच मेसेज अनौपचारिक असतात म्हणत पुरावा म्हणून काही विनोदाचे मेसेज शेतकऱ्याने न्यायालयात दाखल केले.
डॉ. खुशालचंद बाहेती
नवी दिल्ली - इमोजीच्या जगात प्रथमच थम्स अपला कॅनडाच्या न्यायालयात 'कायदेशीर स्वीकार' अशी मान्यता मिळाली आहे. मार्च २०२१मध्ये एका कंपनीने एका शेतकऱ्याकडून ८७ मेट्रिक टन अंबाडी खरेदी करण्याचे मान्य केले. कंपनीने शेतकऱ्याला करार ऑनलाइन पाठवून 'प्लीज कन्फर्म' असा मेसेज पाठवला. शेतकऱ्याने याला थम्स अप इमोजीने उत्तर दिले. पुढे शेतकऱ्याने अंबाडी दिली नाही व पिकाचे भाव वाढले. कंपनीने कॅनडातील किंग्ज कोर्टात कराराचा भंग केल्याबद्दल शेतकऱ्यावर भरपाईचा दावा दाखल केला.
करार पोहोचल्याचे कळविण्यासाठी थम्स अप इमोजी पाठवण्यात आली होती आणि याचा अर्थ करार मान्य असा नव्हता, असा युक्तिवाद शेतकऱ्याने केला. बरेच मेसेज अनौपचारिक असतात म्हणत पुरावा म्हणून काही विनोदाचे मेसेज शेतकऱ्याने न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने म्हटले की, शब्दकोशाच्या जगात इमोजी आले आहेत. त्याचा अर्थ "डिजिटलमध्ये संमती, मान्यता किंवा प्रोत्साहन म्हणून संप्रेषण व्यक्त करण्यासाठी याचा वापर केला जातो."
काय म्हटले न्यायालयाने? "ते कितपत अधिकृत आहे याची मला खात्री नाही. पण माझ्या दैनंदिन वापरातील समजुतीशी हे सुसंगत आहे असे दिसते, असे म्हणत सर्व परिस्थितींचा विचार करता या इमोजीचा अर्थ कराराला मान्यता होती, असा निकाल देत न्यायालयाने ८२,२००.२१ डॉलर नुकसान भरपाई मंजूर केली.