चोरट्यांनी 10 लाखांचे ब्रँडेड शूज चोरले; पण मोठी चूक लक्षात येताच चक्रावून गेले, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 21:08 IST2023-05-09T21:06:32+5:302023-05-09T21:08:29+5:30
सोशल मीडियावर एका विचित्र चोरीच्या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

चोरट्यांनी 10 लाखांचे ब्रँडेड शूज चोरले; पण मोठी चूक लक्षात येताच चक्रावून गेले, जाणून घ्या...
तुम्ही चोरीच्या अनेक घटना ऐकल्या असतील, पण सध्या चोरीची एक अशी घटना समोर आली आहे, जी ऐकून तुम्हाला हसू आवरणार नाही. तीन चोरांनी एका शोरुमचे शटर तोडून 200 हून अधिक ब्रँडेड शूज चोरी केले. या बुटांची किंमत 10 लाखांहून अधिक होती. मात्र चोरीनंतर सत्य समोर येताच चोरांच्या पायाखालची जमीन सरकली.
मीडिया रिपोर्टनुसार, पेरुच्या हुआनकायो शहरात तीन चोरट्यांनी एका शोरुममध्ये प्रवेश केला. त्यांनी वेगवेगळ्या ब्रँडचे 220 स्नीकर्स (शूज) पोबारा केला. या शूजची किंमत सुमारे 10 लाख 35 हजार रुपये होती. पण, चोरी करताना त्यांनी किती मोठी चूक केली आहे, याची चोरट्यांना अजिबात कल्पना नव्हती. या चोरीमुळे शोरुम मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, पण चोरट्यांना एक रुपयाचाही फायदा झाला नाही. कारण त्यांनी फक्त एकाच पायाचे शूज चोरी केले होते.
चोरट्यांनी चोरलेले शूज शोरुममध्ये प्रदर्शनासाठी ठेवलेले होते. हे सर्व 220 शूज एकाच पायाचे (उजवीकडे) होते. त्यामुळए चोरांना ना ते वापरता येणार, ना विकता येणार. एका पायाच्या बुटाचा कोणालाच उपयोग नाही. 30 एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर सोशल मीडियावर याची चर्चा होत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरांचा शोध घेतला जात आहे.