पोलीस ठाण्यात तृतीयपंथीयांचा विवस्त्रावस्थेत गोंधळ, व्हिडिओ झाला व्हायरल
By admin | Published: February 26, 2016 07:25 PM2016-02-26T19:25:43+5:302016-02-26T19:41:12+5:30
आपली कागदपत्रे परत मिळावी म्हणून तृतीयपंथीयांनी चक्क पोलीस ठाण्यात विवस्त्रावस्थेत गोंधळ घातला. अत्यंत बीभत्स असा हा प्रकार व्हॉटस्अपवरून व्हायरल झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे.
अश्लील वर्तन : हतबल पोलिसांनी घातली समजूत
नागपूर : आपली कागदपत्रे परत मिळावी म्हणून तृतीयपंथीयांनी चक्क पोलीस ठाण्यात विवस्त्रावस्थेत गोंधळ घातला. अत्यंत बीभत्स असा हा प्रकार व्हॉटस्अपवरून व्हायरल झाल्याने समाजमन अस्वस्थ झाले आहे.
१९ फेब्रुवारी २०१६ च्या दुपारी १.३० ते २ या वेळेतील हा संतापजनक प्रकार आहे. नंदनवन पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज सुरू असताना अचानक १५ ते २० तृतीयपंथी पोलीस ठाण्यात शिरले. ‘उत्तमबाबा’ याने आमचे आधार कार्ड, मतदार ओळखपत्र आणि अशीच महत्त्वपूर्ण कागदपत्रे घेतली. ती तो परत करीत नाही. त्यामुळे आमची कागदपत्रे परत मिळवून द्या, अशी तृतीयपंथीय मागणी करू लागले. ‘प्रकरण पाचपावलीतील आहे, त्यामुळे आम्ही यात काही करू शकत नाही’, असे तेथील एका नवीन पोलीस उपनिरीक्षकाने त्यांना सांगितले. ‘तुम्ही पाचपावलीच्या ठाण्यात जा, तुम्हाला तेथे पाहिजे ती मदत मिळेल’, असेही उपनिरीक्षकाने सांगितले. मात्र, तृतीयपंथीय ऐकायला तयार नव्हते. त्यांनी पोलिसांना शिव्याशाप देणे सुरू केले. अचानक एकापाठोपाठ पाच ते सात तृतीयपंथीयांनी अंगावरचे कपडे फेकून विवस्त्रावस्थेत ठाण्यात गोंधळ घालून पोलिसांना शिवीगाळ सुरू केली. या घाणेरड्या प्रकारामुळे पोलीस हादरले. ठाण्यातील कामाच्या निमित्ताने उपस्थित तर अचंबितच झाले. त्यांना कसे आवरावे, असा प्रश्न पडल्याने काही जण चक्क पोलीस कर्मचारी ठाण्याच्या बाहेर पळाले. तृतीयपंथीयांना त्यामुळे जास्तच चेव चढला. त्यांनी ठाण्याच्या आवारात आक्षेपार्ह्य वर्तन करीत अक्षरश: हैदोस घातला. शेवटी सयाम नामक पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्यांना कसेबसे आवरत पाचपावली ठाण्यात नेले. तेथे नंतर तृतीयपंथीयांचा प्रमुख उत्तमबाबा याला बोलावून कागदपत्रांविषयी विचारणा करण्यात आली. (प्रतिनिधी)
सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया
तृतीयपंथीयांच्या या संतापजनक वर्तनाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. शिव्या, शाप नको म्हणून समाज तृतीयपंथीयांच्या वर्तनाकडे दुर्लक्ष करतात. ते मागतील तेवढे पैसे देऊन त्यांना परत पाठवितात. मात्र, त्याचा काही तृतीयपंथी गैरफायदा घेतात. ते अनेक ठिकाणी गुन्हेगारांसारखे वागतात. मनासारखे पैसे मिळावे म्हणून लग्नसमारंभ, अथवा दुसऱ्या कोणत्या समारंभात गोंधळ घालतात, अश्लील वर्तन करतात. विशेष म्हणजे, नंदनवन ठाण्यात त्यांनी असाच गोंधळ घालून पोलिसांनी त्यांच्यावर कसलीही कारवाई केली नसल्यामुळे सर्वसामान्यांच्या संतापात आणखीनच भर पडली आहे. यामुळे ही मंडळी जास्त निर्ढावेल, अशी प्रतिक्रियाही अनेक जण व्यक्त करीत आहेत.