ताडोबातील हा बर्डमॅन काढतो 200 पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2023 10:38 AM2023-04-08T10:38:16+5:302023-04-08T10:38:35+5:30
पर्यटकांचे आकर्षण: अभयारण्यात आवाजाचे शो
लोकमत न्यूज नेटवर्क, चंद्रपूर / हिंगोली : तब्बल २०० पशुपक्ष्यांचा हुबेहूब आवाज काढणारा ‘बर्डमॅन’ सध्या पर्यटकांमध्ये चर्चेत आहे. सुमेधबोधी गंगाराम वाघमारे असे त्यांचे नाव आहे. हिंगोली तालुक्यातील कलगाव येथील रहिवासी असलेले वाघमारे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात कार्यरत आहेत. त्यांच्या सुमधूर आवाजाने पक्षी, प्राणी त्यांच्याजवळ गोळा होतात.
पशुपक्ष्यांचे आवाज काढण्याच्या या कलेतून सुमेधबोधी यांची ओळख निसर्ग मार्गदर्शक, निसर्गप्रेमी झाली आहे. अभिनेते सयाजी शिंदे, नागराज मंजुळे यांच्या सोबतचे त्यांचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
या पक्षांचे आवाज
सुमेधबोधी मोर, पोपट, कावळा, कोकिळा, भारद्वाज, बुलबूल, कोंबडा, कोंबडी, चिमणी, साळुंकी, कोतवाल, धनेश, सुतार, घुबड, कबूतर, पारवा आदी पक्ष्यांसह बैल, गाय, म्हैस, रेडा, शेळी, बेडूक, कोल्हा, कुत्रा, घोडा, मांजर, उंदीर या प्राण्यांसह डासांचाही हुबेहूब आवाज काढतो.
सध्या ते चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा नॅशनल पार्कमध्ये ‘नॅचरलिस्ट’ (निसर्ग मार्गदर्शक) म्हणून काम करतात. ताडोबात येणाऱ्या पर्यटकांना पक्षी, प्राण्यांबद्दल मार्गदर्शन करतात. सुमेधबोधीच्या या कार्याबद्दल वनविभागाच्या वतीनेही गौरव करण्यात आला आहे. त्यांचे शोदेखील ताडोबात आयोजित होत आहेत. पशु-पक्ष्यांसह निसर्गरक्षणाचे आवाहन ते विविध शोमधून करतात.