'हे' आहे आतापर्यंतचं सर्वांत उंच कुटुंब; अख्ख्या जगातच रेकॉर्ड केलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2022 10:36 AM2022-04-25T10:36:45+5:302022-04-25T10:36:56+5:30
या कुटुंबाचं नाव आहे ट्रॅप. पाच कुटुंबाच्या या सदस्यांतील लोकांची नावं आहेत, स्कॉट, क्रिसी, सावाना, मोली आणि ॲडम. या कुटुंबाची सरासरी उंची किती असावी?
अनेक घरांत आईवडील, इतर भावंडांची उंची सर्वसाधारण असली, तरी एखादंच मूल इतकं उंच किंवा क्वचित इतकं बुटकं निघतं की आपल्याला आश्चर्य वाटतं. अर्थात सर्वसाधारण नियम हाच, की ज्या घरात आईवडिलांची उंची सर्वसाधारण किंवा उंच असेल, तर त्यांची मुलंही बहुतांश वेळा तशीच असतात. काही घरांमध्ये आई-वडिलांपैकी एकाचीच उंची खूप जास्त आणि दुसऱ्याची सर्वसाधारण असते. अशा घरांतही काही वेळा असमतोल पाहायला मिळतो. त्यांना जर एकापेक्षा जास्त मुलं असतील, तर एक सर्वसाधारण आणि दुसरा अतिशय उंच असतो.
अमेरिकेतलं एक कुटुंब मात्र याला अपवाद आहे. या घरातील आई म्हटलं, तर तशी ‘बुटकी’ आहे, वडील मात्र उंच, तरीही या घरातील सर्व मुलांची उंची इतकी जबरदस्त, की त्यांनी अख्ख्या जगातच रेकॉर्ड केलं आहे. या कुटुंबाची सरासरी उंची जगात सर्वांत जास्त आहे. त्यामुळे त्यांची गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. खुद्द गिनेस बुकच्या अधिकाऱ्यांनी ही गोष्ट सोशल मीडियावर शेअर केली, त्यामुळे या कुटुंबाच्या ‘शोधात’ अख्खं जग लागलं आहे. या कुटुंबातील माणसं दिसतात कशी, ती किती उंच आहेत, काय वयाची आहेत.. या साऱ्या गोष्टींबद्दलची उत्सुकता एकदम वाढली आहे. त्यामुळे जगातल्या या सर्वात उंच कुटुंबाचे फोटो, व्हिडीओ झपाट्यानं शेअर होताहेत.
या कुटुंबाचं नाव आहे ट्रॅप. पाच कुटुंबाच्या या सदस्यांतील लोकांची नावं आहेत, स्कॉट, क्रिसी, सावाना, मोली आणि ॲडम. या कुटुंबाची सरासरी उंची किती असावी? - तब्बल २०३.२९ सेंटिमीटर म्हणजे सहा फूट ८.०३ इंच! ‘गिनेस बुक’चे रिपोर्टर अलिसियामेरी रॉड्रीग्ज यांच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या मिनिसोटा परिसरातील हे कुटुंब म्हणजे जगभरातील एक अजब नमुना आहे. या कुटुंबात सर्वांत ‘बुटक्या’ आहेत, त्या म्हणजे क्रिसी. त्यांची उंची १९१.२ सेंटीमीटर म्हणजे फक्त सहा फूट तीन इंच आहे. त्यांच्या पतीची उंची आहे २०२.७ सेंटिंमीटर म्हणजे सहा फूट आठ इंच. त्यांची तीन मुलं मात्र फारच उंच आहेत. त्यातील सर्वांत धाकटा मुलगा ॲडम म्हणजे तर एखादा ‘टॉवर’च आहे. २२ वर्षांच्या ॲडमची उंची आहे तब्बल २१.७१ सेंटीमीटर (सात फूट तीन इंच). २७ वर्षांच्या सावाना ट्रॅप-ब्लॅन्चफिल्डची उंची आहे २०३.६ सेंटीमीटर (६.८ फूट) आणि त्यांची २४ वर्षीय बहीण मोली स्टीडची उंची आहे १९७.२६ सेंटीमीटर (६.६ फूट)!
ट्रॅप कुटुंबातील एवढ्या उंच ‘शिड्या’ पाहून पाहणाऱ्यंना खूप आश्चर्य वाटायचं. सगळेच जण इतके उंच कसे, म्हणून लोक अचंब्यात पडायचे आणि येता-जाता माना वर करुन त्यांच्याकडे बघायचे. ॲडमलाही या गोष्टीचं खूप अप्रूप वाटायचं. त्यामुळे त्यानं एकदा ठरवलं, आपल्या कुटुंबातील सगळ्यांची उंची आणि सरासरी उंची एखाद्या जाणकाराकडूनच मोजून घ्यावी. त्यानुसार हे अख्खं कुटुंब ‘इसेन्ट्रीया हेल्थ’च्या डॉ. ॲना सुडोह यांच्याकडे गेलं.
डॉ. ॲना यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याची उंची अतिशय बारकाईनं मोजली. एकदा उभं राहून, एकदा त्यांना झोपवून, असं तीन-तीनदा प्रत्येकाची उंची मोजली. या तिन्ही मोजमापांतून प्रत्येकाची आणि त्यानंतर अख्ख्या कुटुंबाची सरासरी उंची काढली. उंची मोजण्यात एक मिलिमीटरचीही गडबड होऊ नये, यासाठी डॉ. ॲना यांनी अतिशय काळजी घेतली आणि त्यासाठी अत्याधुनिक साधनांचाही वापर केला.. ही उंची मोजल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, या कुटुंबाची सरासरी उंची जगात सर्वांत जास्त आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनंही त्यावर शिक्कामोर्तब केलं. आपल्या उंचीमुळे सर्वसामान्य आयुष्यात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी आपण जगात आपल्या कुटुंबाचं स्थान ‘सर्वोच्च’ असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांना त्याचा अभिमानच वाटला. ॲडम तर सांगतो, हे ऐकून तर मी इतका खूश झालो की बस! आपण आणि आपलं कुटुंबं खरोखरच ‘स्पेशल’ असल्याचं मला वाटायला लागलं. कोणतीही नवी व्यक्ती भेटली आणि आपणहून जवळ येऊन तिनं विचारलं, ‘तुझी उंची किती?’ अशा वेळी मला खरोखरच स्वत:चा अभिमान वाटतो. ट्रॅप कुटुंब तर सांगतं, जेव्हा आम्ही सारे जण सोबत असतो, तेव्हा लाेक आमच्याकडे बघत असतात. लोकांच्या या बघण्याला आता ‘अधिकृत मान्यता’ मिळाली आहे आणि ही गोष्ट आम्हा साऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे.
जगातील सर्वांत उंच तरुणी!
गेल्गी ही जगातील सर्वांत उंच महिला असल्याचंही गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनं नुकतंच जाहीर केलं आहे. गेल्गी ही चोवीस वर्षांची तरुणी असून तिची उंची आहे दोन मीटर १५ सेंटिमीटर म्हणजेच ७.०७ फूट! मात्र ‘विव्हर सिंड्रोम’ या असाध्य आजारानं तिला ग्रासलं असल्यानं व्हीलचेअर किंवा फ्रेमच्या साहाय्यानंच तिला चालावं लागलं. ‘जगातील सर्वांत उंच महिला’ या सन्मानाचा उपयोग ती या आजाराबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी करते.