अजबच! मनुष्यांसारखं चालतं 'हे" झाड, असतात मोठाले पाय; जाणून घ्या याची खासियत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 16:16 IST2025-02-06T16:13:31+5:302025-02-06T16:16:10+5:30
Walk Tree : आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबाबत सांगणार आहोत, जे मनुष्यांसारखं चालू शकतं. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही.

अजबच! मनुष्यांसारखं चालतं 'हे" झाड, असतात मोठाले पाय; जाणून घ्या याची खासियत!
Walk Tree : पृथ्वीवर अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत. अशात कितीतरी गोष्टी आहेत, ज्यांबाबत आपल्याला काहीच माहीत नसतं. अनेक गोष्टी अशा असतात ज्यांवर विश्वासही बसत नाही. अशीच एक खास बाब आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जी वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. आज आम्ही तुम्हाला एका अशा झाडाबाबत सांगणार आहोत, जे मनुष्यांसारखं चालू शकतं. कदाचित यावर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हे सत्य आहे. पृथ्वीवर एक असं झाड आहे, ज्याला पाय आहेत आणि ते चालू शकतं. एका जागेवरून ते दुसऱ्या जागी जाऊ शकतं.
मनुष्यांप्रमाणेच झाडा-झुडपांमध्येही जीव असतो हे तुम्हाला माहीत असेलच. अशात हे झाड आपल्यासारखं श्वासही घेऊ शकतं आणि चालूही शकतं. पण अजूनही निसर्गाच्या या करिश्म्याबाबत अनेकांना माहीत नाही.
मनुष्याप्रमाणं चालू शकणाऱ्या या झाडाचं नाव आहे कॅसापोना. हे झाड एक्वाडोरच्या घनदाट रेन फॉरेस्टमध्ये आढळतं. ताडाच्या प्रजातीच्या या झाडाला 'धावणारं झाड' किंवा 'चालणारं झाड' असं म्हणतात. तसं या झाडाचं वैज्ञानिक नाव सोक्रेटिया एक्सोर्रिजा आहे.
एक्वाडोरच्या घनदाट जंगलात सॉइल इरोशन फार जास्त आहे. जंगल दाट असल्यानं इथे प्रकाश सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही. अशात जेव्हा झाडाच्या मुळांवरील माती सैल होते, तेव्हा मजबूत माती आणि पुरेसा सूर्य प्रकाश मिळवण्यासाठी झाडाला नवीन मूळं येतात. नवीन मूळं हळूहळू कठोर मातीमध्ये घट्ट उभे राहतात आणि जुन्या मुळातील माती सैल होते. अशाप्रकारे झाड आपली जुनी जागा सोडून पुढे नवीन जागी उभं राहतं.
वनस्पती अभ्यासक पीटर व्रान्स्की यांनी झाडाच्या मुळाच्या माध्यमातून हालचाल करण्याच्या क्षमतेचं रहस्य सगळ्यांसमोर आणलं होतं. त्यांच्या शोधामुळे समोर आलं की, कॅसापोना झाड जिवंत राहण्यासाठी आपली जागा बदलत राहतं.
मात्र, जागा बदलण्याची ही प्रक्रिया फार हळू होते आणि झाड एका दिवसात दोन ते तीन सेंटीमीटर इतकंच पुढे सरकतं. एका झाडाला पूर्णपणे जागा बदलण्यासाठी जवळपास दोन वर्षाचा वेळ लागतो. कधी कधी झाड आपल्या मूळ स्थितीपासून जवळपास २० मीटरपर्यंत वर पोहोचतं.
कॅसापोना झाड निसर्गाचं एक अद्भुत उदाहरण आहे. जे सिद्ध करतं की, प्राण्यांप्रमाणे झाडंही जिवंत राहण्यासाठी हालचाल करत असतात. झाडाची ही खासियत पर्यावरण वैज्ञानिकांसोबतच सामान्य लोकांनाही अवाक् करणारी आहे.