वाघाला नोटा खाण्यास द्यायला गेला आणि दोन बोटं गमावून बसला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2017 12:26 PM2017-11-27T12:26:14+5:302017-11-27T12:28:08+5:30
प्राण्यांना खायला देऊ नका अशा पाट्या प्राणीसंग्रहालयात किंवा सर्कशीच्या ठिकाणी लावलेल्या असतात मात्र तरिही काही लोक प्राण्यांना खायला घालतात.
बीजिंग- प्राण्यांना खायला देऊ नका अशा पाट्या प्राणीसंग्रहालयात किंवा सर्कशीच्या ठिकाणी लावलेल्या असतात मात्र तरिही काही लोक प्राण्यांना खायला घालतात. यामुळे प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अन्नापेक्षा या नव्या बिस्किट किंवा तत्सम पदार्थांची सवय लागते. पण या अशा खाऊ घालण्याने चीनमध्ये एक नवीच समस्या उद्भवल्याचे पाहायला मिळालं. सर्कशीत काम करणाऱ्या वाघ आणि सिंहाला बै नावाचा ६५ वर्षिय माणूस चक्क नोटा खाऊ घालू लागला. या प्रयत्नात वाघाने त्याची दोन बोटे चावून हातावेगळी केली.
चीनच्या हेनान प्रांतात होत असलेल्या सर्कशीसाठी हे प्राणी आणले गेले होते. शेजारंशेजारी असणाऱ्या दोन पिंजऱ्यांपैकी एकात वाघ व एकात सिंह होता. त्यांना पाहून दारु प्यायलेल्या बै ने एका हाताने वाघाला व एका हाताने सिंहाला अशा दोन नोटा खाऊ घातल्या. सिंहाने त्याच्या हातातली नोट स्वीकारली पण वाघोबांना मात्र हा प्रकार रुचला नाही. वाघाने सरळ बै चा हात पकडला. आपला हात वाघाच्या जबड्यात असल्याचे लक्षात आल्यावर मात्र बैची शुद्ध हरपली. हा प्रकार लक्षात येताच सुरक्षारक्षकांनी धावत येत बैचा हात वाघाला जबड्यातून सोडायला लावला पण तोपर्यंत त्याची दोन बोटे नाहिशी झाली होती.
त्यानंतर बै ला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेथे त्याची प्रकृती चांगली असल्याचे हाँगकाँगमधील माँर्निग पोस्ट वर्तनानपत्राने प्रसिद्ध केलं आहे. सर्कस पाहण्यापुर्वी बै दारु प्यायला होती, अशी त्याच्या एका नातेवाईकाने माहिती दिली आहे.