लोकांना कामाला लावणारी ‘टिकटॉक’ कॉफी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2022 09:54 AM2022-06-10T09:54:02+5:302022-06-10T09:54:31+5:30
डाल्गोना कॉफीचे मूळ आहे दक्षिण कोरियात. जुंग इल हा लोकप्रिय अभिनेता एक खाद्यविषयक व्हिडिओ बनवताना एका कॉफी शॉपमध्ये गेला. तिथे त्याने कॉफी मागवली. कारण इथली कॉफी फार लोकप्रिय होती.
डाल्गोना कॉफी आठवते? तीच ती, लोकांना लॉकडाऊनमध्ये कामाला लावणारी फेसाळ कॉफी. ही डाल्गोना कॉफी टिकटॉक कॉफी या नावानेसुद्धा ओळखली जात होती. एखाद्या गोष्टीचा ट्रेन्ड सोशल मीडियावर कसा सुरू होईल काही सांगता येत नाही. जसा हा ट्रेन्ड सुरू होतो, तसा तो लगेच विरतोही. डाल्गोना कॉफीबद्दल तसे म्हणता येत नाही. एके काळी भारतच नव्हे तर जगभरातले लाखो लोक घरी डाल्गोना कॉफी बनवत होते.
डाल्गोना कॉफीचे मूळ आहे दक्षिण कोरियात. जुंग इल हा लोकप्रिय अभिनेता एक खाद्यविषयक व्हिडिओ बनवताना एका कॉफी शॉपमध्ये गेला. तिथे त्याने कॉफी मागवली. कारण इथली कॉफी फार लोकप्रिय होती. उपाहारगृहाच्या मालकाने एका कपात दोन चमचे कॉफी आणि दोन चमचे साखर तब्बल चारशे वेळा वेगात ढवळली आणि कॉफी साखरेच्या मिश्रणाचा हलक्या रंगांचा फेस तयार झाला. या शो चे तीन चार निवेदक होते, त्यातला एक जण म्हणाला, अरे ही तर धायगोना (डाल्गोना) आहे.
कोरियात साखर आणि सोड्यापासून बनवलेल्या घरगुती कॉफीला धायगोना (अमेरिकन स्वरूप डाल्गोना) म्हणतात. ही कॉफी बनवण्याची चढाओढ त्यानंतर दक्षिण कोरियातल्या लोकांमध्ये लागली. त्याची क्रेझ लॉकडाऊनच्या काळात वाढली. आधी टिकटॉकवर आणि नंतर सगळ्या सोशल मीडियावर सेलिब्रिटींपासून सामान्य लोक डाल्गोना कॉफी करताना दिसू लागले.
खरे तर फेटाळलेली कॉफी हा प्रकार भारतात नवा नाही, भारत, पाकिस्तान आणि मकावमध्ये कित्येक ठिकाणी कॉफी फेटून बनवण्याची पद्धत आहे. आपल्याकडे दूध गरम करत असताना एका कपात इन्स्टंट कॉफी साखरेत फेटून घेऊन मग ती दुधात मिसळतात. असे केल्याने कॉफी फेसाळ तर बनतेच; पण त्याचा स्वाद दुणावतो. डाल्गोना फोटोसाठी बनली; पण ती चवीसाठी फारशी लोकप्रिय झाली नाही, याचे कारण त्यात कॉफी आणि साखर अति प्रमाणात होते; पण पाणी फार कमी. त्यामुळे चवीचा बॅलन्स बिघडला असावा. एकूण लोकप्रियता टिकण्यासाठी फक्त दिसणे महत्त्वाचे नाही, तर मुळात गोष्टीतच दम हवा.