वेळ-काळ या संकल्पनांना इथे काहीच नाही अर्थ!; नॉर्वेमधील सोमेरॉय बेटावर मध्यरात्रीही असतो उजेड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 05:17 AM2019-06-30T05:17:44+5:302019-06-30T05:18:14+5:30
नॉर्वेच्या संसदेत येथील रहिवाशांचा अर्ज आला आहे. येथे जर रात्रच होत नसेल, तर आम्हाला घड्याळे आणि वेळेचे बंधन कशाला हवे? असा ग्रामस्थांचा सवाल आहे.
सोमेरॉय मच्छीमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या गावात मध्यरात्र असते खरी. मात्र, सूर्य तेव्हाही तळपत असतो. नॉर्वे देशातील ट्रॉम्स कंट्री परिसरात हे अनोखे गाव आहे. मे, १८ ते जुलै, २६ या ७० दिवसांच्या काळात उंच शिखरावर वसलेल्या या व्दीपाच्या क्षीतिजावर काळोखच
सरत नाही.
घड्याळाचे काटे मध्यरात्री बाराचा आकडा दाखवित असतात. मात्र, त्यावेळी गावात मुले खेळत असतात, इतरांची कामे सुरू असतात, मासेमारी सुरू असते. झोपेची वेळ झाली, असे घड्याळ सांगते. मात्र, सॉमेरॉयवासी तिकडे दुर्लक्ष करतात.
तिथे जेमतेम ३५0 लोक राहतात. मान्य असणारी वेळ ही संकल्पनाच हे गाव धुडकावून देण्याच्या प्रयत्नात आहे. नॉर्वेच्या संसदेत येथील रहिवाशांचा अर्ज आला आहे. येथे जर रात्रच होत नसेल, तर आम्हाला घड्याळे आणि वेळेचे बंधन कशाला हवे? असा ग्रामस्थांचा सवाल आहे.
मच्छीमार मध्यरात्रीनंतर घराबाहेर पडतात. आम्ही दमलो असलो, तरी डुलकी काढून ताजेतवाने होतो. आम्ही वेळेशी बांधलो गेलेलो नाही. आम्ही सारी घड्याळे फेकून देऊन वेळ का विसरू नये? तसे केल्याने आमचे जगणे अधिक सोपे होईल, असे ते म्हणतात.
सोमेरॉयचा मुख्य उत्पन्नस्रोत पर्यटन आणि मच्छीमारीतून आहे. हे गाव जगातील पहिले वेळमुक्त क्षेत्र जाहीर झाल्यास पर्यटकांच्या आकर्षणात आणखी वाढ होईल, असे स्थानिकांना वाटते. येथे समय हा भूतकाळच होता.
सोमेरॉयमध्ये नोव्हेंबर ते जानेवारी या काळात अंधार होतो. उन्हाळ्यात मात्र येथील नागरिकांना झोप नसतेच. मुलांना ‘अंधार पडण्यापूर्वी घरी या’ असे म्हणण्याची सोय नाही. तुम्ही तसे म्हणालात, तर आॅगस्टपूर्वी तुम्ही मुलांना घरात पाहू शकणार नाही, असे लोक म्हणतात.