ऐकावे ते नवलच.! 'हा' पत्रकार ऑफिसला विमानानं जातो; ९०० किमी प्रवास स्वस्तात पडतो
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2024 02:20 PM2024-01-10T14:20:04+5:302024-01-10T14:20:37+5:30
कोविड महामारी कमी झाली. त्यानंतर ऑफिसनं २०२२ मध्ये पुन्हा ऑफिसला येण्याचे आदेश दिले.
तुम्ही ऑफिसला कसे जाता? सोपं आहे तुमचं उत्तर असेल ट्रेन, मेट्रो किंवा स्वत:च्या गाडीने जाता. परंतु तुम्ही कधी ऐकलंय कुणी फ्लाईटनं ऑफिसला ये-जा करत असेल. हे ऐकून तुम्हाला हा विनोद वाटेल मात्र अमेरिकेच्या ओहियो इथं राहणारा एक व्यक्ती याचमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आला आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका रिपोर्टनुसार, हा पत्रकार न्यूयॉर्कमध्ये कामाला जाण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा ओहियो येथून फ्लाईट जातो. परंतु यामागचे त्याचे कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. न्यूयॉर्कमध्ये भाड्याने घर घेऊन राहण्यापेक्षा ऑफिसला ये जा करण्यासाठी ओहियोतून जवळपास ९०० किमीचा हवाई प्रवास करणे स्वस्त आहे. कोविड १९ महामारीमुळे सुरुवातीला कंपनीने वर्क फ्रॉम होम दिले. तेव्हा हा व्यक्ती न्यूयॉर्कहून कोलंबस येथील ओहियो इथं त्याच्या घरी पोहचला.
मात्र कोविड महामारी कमी झाली. त्यानंतर ऑफिसनं २०२२ मध्ये पुन्हा ऑफिसला येण्याचे आदेश दिले. तेव्हा न्यूयॉर्कमध्ये स्वस्त बजेटमध्ये घर शोधणं आव्हानात्मक बनले. त्यानंतरही त्याला समाधानकारक घर सापडले नाही म्हणून या व्यक्तीने कोलंबसवरून फ्लाईटने न्यूयॉर्क ऑफिसला जाणे सुरू केले. तो व्यक्ती म्हणाला की, मी रोज सकाळी ४.१५ चा अलार्म लावतो. न्यूयॉर्कला जाण्यासाठी सकाळी ६ वाजता मी एअरपोर्टला पोहचतो. न्यूयॉर्कमध्ये एका चांगल्या अपार्टमेंटमध्ये घर घेतलं तरीही ओहियात घरी राहून फ्लाईटचे येणे जाण्याचे भाडे पकडले तरी तितका खर्च होत नाही जितका न्यूयॉर्कमध्ये राहण्यात होतो. फ्लाईट माझ्यासाठी बेस्ट पर्याय आहे. ३ तासांत मी न्यूयॉर्क ते ओहियो येणे जाणे होते असं त्याने सांगितले.
दरम्यान, दोन शहरांमधील प्रवासामुळे या व्यक्तीच्या सोशल लाईफवर खूप परिणाम झाला आहे. त्याचे मित्रही त्याला चीडवू लागले आहेत. परंतु कटर हे पहिलेच व्यक्ती नाही जे पैसे वाचवण्यासाठी फ्लाईटने न्यूयॉर्कला जातात. मागील वर्षी टिकटॉक यूजर सोफिया सेलेन्टोना हिनेही ती न्यूयॉर्क येथे एका जाहिरात कंपनीत काम करते आणि आठवड्याला एक दिवस न्यूयॉर्कने फ्लाईटने जाते असं तिने म्हटलं होते.