भारतातील टॉप 5 चोर बाजार, इथे हवं ते मिळतं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 06:18 PM2018-04-05T18:18:52+5:302018-04-05T18:18:52+5:30
अशा ठिकाणी जर तुम्ही तुमची कार किंवा बाईक घेऊन जात असाल, तर पार्किंग करताना खूप काळजी घ्या.
भारतात असे काही मार्केट आहेत जे खास जागांवर तयार झाले आहेत. आणि या बाजारांमध्ये खास वस्तू विकल्या जातात. अशाच काही बाजारांबद्दल आम्ही सांगणार आहोत जेथे प्रत्येक प्रकारची चोरी केलेली वस्तू खुलेआम विकली जाते. त्यामुळे अशा ठिकाणी जर तुम्ही तुमची कार किंवा बाईक घेऊन जात असाल, तर पार्किंग करताना खूप काळजी घ्या. नाही तर इथे तुमच्याच गाडीचे पार्ट्स विकले जाण्याचीही शक्यता नाकाता येत नाही.
* मुंबई चोर बाजार:
मुंबईतील चोर बाजार हा दक्षिण मुंबईतील मटन स्ट्रीट मोहम्मद अली रोडवर आहे. हा चोर बाजार साधारण १५० वर्ष जूना आहे. हा बाजार आधी ‘शोर बाजार’ या नावाने ओळखला जात होता. कारण येथील दुकानदार जोरजोरात आवाज करून आपल्या वस्तू विकत होते. मात्र, इंग्रज लोक शोर बाजाराचा उल्लेख चुकीचा करत होते. म्हणून या बाजाराचे नामकरण पुढे चोर बाजार असे झाले.
या बाजारात सेकंड हॅन्ड कपडे, ऑटो पार्ट्स, चोरीच्या घड्याळ, चोरीच्या सजावटीच्या वस्तूंसोबतच खूप काही मिळतं. या बाजाराबाबत असेही म्हटले जाते की, या बाजारात तुमच्या घरून चोरी झालेल्या वस्तू तुम्हालाच विकल्या गेल्या तर आश्चर्य नको. या बाजारात तुम्ही जाण्याचा विचार करत असाल तर खिसेकापूंपासून सावध राहणे अतिशय महत्वाचे आहे.
* दिल्लीचा चोर बाजार:
हा देशातील सर्वात जुना चोर बाजार आहे. आधी हा बाजार रविवारी लाल किल्ल्याच्या मागच्या बाजूस भरत होता. आता हा बाजार दरियागंजमध्ये नॉव्हेल्टी आणि जामा मशिदजवळ भरतो. हा बाजार मुंबईच्या बाजारापेक्षा खूप वेगळा आहे. या बाजाराला कबाडी बाजार असेही म्हटले जाते.
* सोतीगंज, मेरठ, युपी !
तुम्हाला तुमची बाईक किंवा कार तुमच्या बायकोपेक्षा जास्त आवडते का ? उत्तर जर ‘हो’ असेल तर सोतीगंज मार्केट फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच उघडं आहे. चोरीच्या गाड्या स्पेअर पार्ट्सचा इथे खजिना आहे. मारुती पासून रोल्स रॉयल्स असे सर्व ब्रॅड इथे मिळतील. इथली एक खास गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या जीप अगदी स्वस्त दारात मिळतील. स्वस्त म्हणजे अगदी ३०,००० रुपयांपर्यंत.
* चेकपेट मार्केट, बंगळूर
हा चोर बाजार तेवढा फेमस नसला तरी इथे दिल्ली आणि मुंबईच्या चोर बाजारात मिळणारं सर्व काही मिळेल. ग्रामोफोन, चोरीचे गॅजेट्स, कॅमेरा, अॅंटीक वस्तू, इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू आणि स्वस्त जिम इक्विपमेंट. जर का तुमच्यात भाव करण्याची कला असेल तर फायदा तुमचा.
* पुदुपेट्टई, चेन्नई
पुदुपेट्टई चोर बाजार हा ‘ऑटो नगर’ म्हणून ओळखला जातो. कारण इथली माणसं कारचे ओरिजीनल पार्ट्स बदलण्यात आणि संपूर्ण कारचा कायापालट करण्यात पीएचडी करून बसलेले आहेत. असेच म्हणावे लागेल. कारचे पार्ट्स तसेच कार बदलण्याचे सामान इथल्या हजारोच्या संख्येने असलेल्या दुकानात एका झटक्यात मिळतील.