इथे डोक्यावर फोडले जातात नारळ, रक्तबंबाळ होऊनही लोक साधी तक्रारही करत नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 04:55 PM2022-05-30T16:55:11+5:302022-05-30T17:10:20+5:30
एक सण तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो, ज्यामध्ये लोकांच्या डोक्यावर नारळ फोडले जातात.
भारत हा सणांचा देश आहे. इथे प्रत्येक धर्माच्या, समुदायाच्या लोकांच्या आपापल्या श्रद्धा आहेत आणि त्यांच्याशी संबंधित विविध सण आहेत. प्रत्येक सण खूप खास असतो आणि त्यांच्याशी निगडीत चालीरीती देखील अनोख्या असतात. परंतु असे अनेक सण आहेत ज्यांच्या मान्यता आश्चर्यकारक आहेत. कारण त्यामध्ये मानवांना त्रासाचा सामना करावा लागतो (Weird Tradition). असाच एक सण तामिळनाडूमध्ये साजरा केला जातो, ज्यामध्ये लोकांच्या डोक्यावर नारळ फोडले जातात (Tradition of Breaking Coconut on Head).
तमिळनाडूमध्ये पावसाळ्यात आदि पेरुक्कू उत्सव साजरा केला जातो, जो पाण्याला समर्पित सण आहे. निसर्गाची पूजा करण्यासाठी लोक हा सण साजरा करतात. प्रत्येक तमिळ कुटुंब त्यांच्या कल्याण, शांती आणि समृद्धीसाठी देवाचे आशीर्वाद मिळविण्यासाठी हा सण साजरा करतात. या सणाशी संबंधित अनेक समजुती आहेत, परंतु त्यातील सर्वात विचित्र म्हणजे भक्तांच्या डोक्यावर नारळ फोडण्याचा खेळ.
डोक्यावर नारळ फोडणं म्हणजे आपल्या भूतकाळातील बेड्या तोडणं आणि स्वतःला देवाच्या स्वाधीन करणं, असं मानलं जातं. ही श्रद्धा पाळायची की नाही हे भक्तावर अवलंबून असलं तरी दरवर्षी हजारो लोक या गोष्टीचं पालन करता आणि तामिळनाडूतील करूर येथील महालक्ष्मी मंदिरात नारळ फोडण्याच्या विधीसाठी जातात.
या प्रथेनुसार एक पुजारी रांगेत बसलेल्या भाविकांचं डोकं धरतो आणि दुसरा त्यांच्या डोक्यावर नारळ फोडतो. यानंतर अनेक भाविकांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना डॉक्टरांकडे जावं लागतं तर काहींना टाकेही घालावे लागतात. परंतु अनेकांना डॉक्टरकडे जाणं आवडत नाही, कारण त्यांना वाटतं की असं केल्यास त्यांना देवाचा आशीर्वाद मिळणार नाही. मंदिरातच अनेक सहाय्यक उपस्थित असतात, जे लोकांच्या दुखापतीवर हळद लावतात, त्यामुळे जखम भरून येते.
आता प्रश्न असा पडतो की असा विश्वास ठेवण्याचं कारण काय? या प्रथेच्या दोन कथा प्रचलित आहेत. एका जुन्या कथेनुसार हजारो वर्षांपूर्वी या ठिकाणी भक्त शिवाची पूजा करत असत. पण त्यांच्या पूजेनेही देव त्यांच्यासमोर प्रकट होत नव्हता. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की नारळालाही शंकराप्रमाणे तीन डोळे आहेत. यानंतर त्यांनी देवाला प्रसन्न करण्यासाठी डोक्यावर नारळ फोडून देवाची पूजा सुरू केली. त्यांच्या तपश्चर्येने भगवान प्रसन्न झाले आणि मग त्यांनी प्रकट होऊन भक्तांना आशीर्वाद दिला.