कारावासाची शिक्षा सुनावताच आरोपीचा न्यायालयात धिंगाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 12:32 PM2019-05-03T12:32:07+5:302019-05-03T12:32:39+5:30
दालनाचा दरवाजा व बाकड्यांना मारल्या लाथा
जळगाव : न्यायालयाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावताच मनोजसिंग सिंकदरसिंग टाक (२७, रा. मलकापूर, जि,बुलडाणा) या आरोपीने न्यायाधीशाच्या दालनात धिंगाणा आरडाओरड केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी न्या. ज्योती दरेकर यांच्या दालनात घडला. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही त्याने दालनाच्या दरवाजाला तसेच बाहेरील बाकडे व खुर्च्यांना लाथा मारल्या.
दरम्यान, जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी स्वत: पकडून आरोपीला बाहेर काढले. तेव्हाही तो संताप व्यक्त करीत होता. माझे लहान मुले आहेत, त्यांनी आत्महत्या करायची का? असेही तो म्हणाला.
चाळीसगाव येथ हिरापूर रोडवरील आदर्श नगरात दगडू दौलत देवरे (६२) व पत्नी जिजाबाई (६०) हे दाम्पत्य वास्तव्यात होते. १ मार्च २०१७ च्या मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी देवरे दाम्पत्यास बेदम मारहाण करून त्यांच्या अंगावरील दागिने तसेच रोकड चोरून नेली. जबर मारहाणीमुळे देवरे दाम्पत्याचा मृत्यू झाला होता.
या खटल्यात गुरुवारी न्या.दरेकर यांनी आरोपी मनोजसिंग टाक याला दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तर त्याचा साथीदार सागररसिंग सिंकदरसिंग बावरी (रा.जालना) याची निर्दोष मुक्तता केली. निकाल वाचत असतानाच मनोज याने प्रचंड आरडाओरड करुन गोंधळ घालायला सुरुवात केली. हा प्रकार पाहून न्यायाधीशांनी तातडीने अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याशी संपर्क साधून बंदोबस्त मागवून घेतला.
या गोंधळानंतर न्या. दरेकर यांनी समोर आलेल्या साक्षी व पुराव्यावरुन हा निकाल दिला आहे. तुला मान्य नसेल तर वरिष्ठ न्यायालयात जावू शकतो. कायद्याने तसे अधिकार तुला दिलेले आहेत अशा भाषेत आरोपीची समजूत घातली.
या प्रकारामुळे खबरदारी म्हणून न्या.दरेकर यांनी पोलिसांना दालनाचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना केल्या. सरकारी वकील शिला गोडंबे यांनाही दालनातच थांबवून घेण्यात आले. बाहेर आल्यानंतरही आरोपीने शिवीगाळ करुन गोंधळ घातला. गुन्हा घडल्यापासून मनोजसिंग हा कारागृहातच होता. त्याच्याविरुध्द १३ गुन्हे दाखल आहेत. मारहाण आणि खून प्रकरणी मुलगा नितीन देवरे यांच्या फिर्यादीवरुन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला कलम ४५९ ,तसेच ४६०,३४ प्रमाणे चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासाधिकारी निरीक्षक आदिनाथ बुधवंत तसेच पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनीदोषारोपपत्र सादर केले.
१४ साक्षीदारांची तपासणी
न्या.ज्योती दरेकर यांच्या न्यायालयात हा खटला चालला. गुन्हा सिध्द करण्यासाठी सहायक सरकारी वकील शिला गोडंबे यांनी प्रभावी युक्तीवाद करुन सरकार पक्षातर्फे १४ साक्षीदार तपासले. त्यात मुळ फिर्यादी, तहसीलदार कैलास देवरे, पंच डॉ. निलेश देवराज, डॉ.बी.पी.बाविस्कर यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. कलम ४५९ अन्वये मनोजसिंग टाक याला दहा वर्ष सश्रम कारावास तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, कलम ४६० अन्वये दहा वर्ष सश्रम कारावास एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली.
महिनाभरात चौथी शिक्षा
सहायक जिल्हा सरकारी वकिल शिला गोडंबे यांनी महिनाभराच्या कालावधीत चार वेळा शिक्षा घेतल्या. याआधी विनयभंगाच्या दोन गुन्ह्यात सश्रम कारावास, अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या गुन्ह्यात दहा वर्ष व गुरुवारी चोरीच्या घटनेत दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणात दहा वर्ष शिक्षा घेतली.