फिरायला गेलेल्या व्यक्तीला छोटीशी चूक पडली महागात, भरावा लागणार ७ लाख रूपये दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:54 AM2024-05-30T11:54:27+5:302024-05-30T11:55:07+5:30
एक छोटीशी चूक त्याला चांगलीच महागात पडली आणि आता त्याला ७ लाख रूपये दंड भरावा लागणार आहे. ही व्यक्ती हा दंड भरल्याशिवाय तिथून जाऊही शकत नाही.
लोक वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जात असतात. एन्जॉय करतात. पण जिथेही तुम्ही फिरायला जाता तेथील नियमही जाणून घेतले पाहिजे आणि ते फॉलो केले पाहिजे. असं केलं नाही तर तुम्हाला तिथे फिरायला जाणं महागातही पडू शकतं. असंच काहीसं एका व्यक्तीसोबत झालं. एक व्यक्ती परदेशात फिरायला गेली होती. पण एक छोटीशी चूक त्याला चांगलीच महागात पडली आणि आता त्याला ७ लाख रूपये दंड भरावा लागणार आहे. ही व्यक्ती हा दंड भरल्याशिवाय तिथून जाऊही शकत नाही.
बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकेत राहणारा टायलर वेनरिचने ऐकलं होतं की, ब्रिटनमधील तुर्क आणि कॅकोस आयलॅंड फारच सुंदर आहेत. अनेक वर्षांपासून तो तिथे जाण्याचा प्लान करत होता. एक दिवस बॅग भरली आणि तो तिथे फिरायला निघाला. मित्रांसोबत आयलॅंड फिरला. गन रेंजमध्येही फिरला. इथेच चुकीने त्याने बंदुकीच्या दोन गोळ्या बॅगेत ठेवल्या. त्याला जराही अंदाज नव्हता की, हे त्याला महागात पडणार आहे.
फिरून झाल्यावर परत जाण्यासाठी क्रूजवर चढण्याआधी त्याला रोखण्यात आलं. कारण त्याने बॅगमध्ये ९ एमएमच्या दोन गोळ्या ठेवल्या होत्या. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. आता हे प्रकरण कोर्टात गेलं आहे. कोर्टाने त्याला ९ हजार डॉलर दंड ठोठावला आहे. भारतीय करन्सीनुसार ही रक्कम ७.५ लाख रूपये होते. इतकंच नाही तर त्याला तीन आठवणे न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे. ही शिक्षा पूर्ण झाल्यावरच त्याला आयलॅंडवरून जाता येणार आहे.
ब्रिटिश कायद्यानुसार, तुर्क आणि कॅकोस आयलॅंडमध्ये जर एखादी बंदूक किंवा बंदुकीच्या गोळ्यांसोबत कुणी आढळलं तर त्यांना १२ वर्षांची शिक्षा होऊ शकते. ब्रिटनमध्ये सतत गोळीबाराच्या घटना घडत असलेल्याने हा कायदा बनवण्यात आला होता. आतापर्यंत कोणत्याही पर्यटकाला इतकी शिक्षा मिळाली नाही. वेनरिचच्या आधीही चार पर्यटक अशा स्थितीत अडकले होते. तेव्हा कुणाला ५ लाख तर कुणाला ८ लाख रूपये दंड ठोठावण्यात आला होता.