...अन् १२ नवरदेवांना गंडा घालणारी 'लुटेरी दुल्हन' मैत्रिणीसह पोलिसांच्या जाळ्यात!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 12:43 PM2020-02-21T12:43:39+5:302020-02-21T12:46:00+5:30
लग्न करून कोणत्याही घरात ती ९ ते १० दिवसांपेक्षा जास्त राहत नव्हती. एका लग्नातील मेहंदीचा रंगही गेलेला नसताना ती दुसऱ्याच्या नावाचं कुंकू लावत होती.
लग्न करून फसवणाऱ्या पुरूष आणि महिलांचे कितीतरी किस्से नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतात. अशाच एका फसव्या नवरीचा शोध दिल्ली, गुडगाव, गाजियाबाद, फरीदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएटासहीत आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांना होता. कारण तिने एक किंवा दोन नाही तर तब्बल १२ पुरूषांशी करून त्यांना गंडवले होते. अखेर या 'लुटेरी दुल्हन'ला पोलिसांनी जेरबंद केलं आहे.
लग्न करून कोणत्याही घरात ती ९ ते १० दिवसांपेक्षा जास्त राहत नव्हती. एका लग्नातील मेहंदीचा रंगही गेलेला नसताना ती दुसऱ्याच्या नावाचं कुंकू लावत होती. बुलंदशहर पोलीस स्टेनशच्या पोलिसांनी या महिलेला आणि तिच्या मैत्रिणीला दनकोर रेल्वे स्टेशनवर अटक केली आहे. दोघींसोबत आणखी एक व्यक्ती होती, पण ते पळून जाण्यात यशस्वी ठरली. मात्र, मुख्य आरोपी महिला सापडल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. कारण अनेक दिवसांपासून तिचा शोध सुरू होता.
कशी आली हाती?
सिकंदराबादमधील मसौता गावातील रहिवाशी मनोजचं लग्न ३१ जानेवारीला पायलसोबत झालं होतं. हे लग्न राम आणि जानकीने लावून दिलं होतं. ९ फेब्रुवारीच्या रात्री राम आणि जानकीसोबत ६ लाख रूपयांचे दागिने घेऊन पसार झाली. मनोजने लगेच सिकंदराबाद पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. दरम्यान पोलिसांना सुद्धा लगेच माहिती मिळाली की, राम, पायल आणि जानकी दनकौर रेल्वे स्टेशनवर आहेत. पोलीस पोहचले तेव्हा त्यांना पाहून राम फरार झाला पण पायल आणि जानकी सापडल्या. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात दागिने ताब्यात घेण्यात आले.
कसा करायचे प्लॅन?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पायलचं लग्न झालं असून तिच्या खऱ्या पतीचं नाव योगेश आहे. ती दिल्लीतील उत्तम नगरमध्ये राहणारी आहे. जानकीचंही लग्न झालं असून ती विकासपूरमध्ये राहणारी आहे. हे सगळे बहीण, भाऊ किंवा मित्र बनून सोयरीक घेऊन जात होते. ही सोयरीक करताना कधी जानकी तर कधी पायलचा फोटो मुलांना दाखवला जायचा. लग्न झाल्यावर काही दिवस त्या नवीन घरात रहायच्या आणि चोरी करून पळून जायच्या.
काही दिवसांसपूर्वी फरीदाबादच्या तिल गावातील मनोजसोबत लग्न करून ८ दिवसांनंतर दागिने घेऊन फरार झाले होते. त्यांनी अशाचप्रकारे १२ जणांना फसवले. त्यांनी पटना, मेरठ, गाझियाबाद, सहारनपूर, गुडगाव, फरीदाबाद, नोएडा, ग्रेटर नोएडा इत्यादी ठिकाणांवर हे कारनामे केले आहेत.