जन्माच्या आधीपासून पोटातच होते एकमेकांना घट्ट पकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2017 06:56 PM2017-11-02T18:56:20+5:302017-11-03T18:11:32+5:30
त्या दोन्ही जुळ्यांचा जन्म होईल की नाही इथपर्यंत डॉक्टर आणि त्यांच्या पालकांना शंका होती.
गॉडलमिंग : भावा-भावांमधलं प्रेम किती अतुट असतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. गुंतागुंतीच्या जुळ्यांच्या प्रसुतीदरम्यान दोन्ही बाळांनी आईच्या पोटातच एकमेकांना घट्ट धरून ठेवल्याने दोघांचाही जीव वाचला आहे. दोघांचीही वाढ एकाच पिशवीत होत असल्याने जुळ्यांच्या जीवाला धोका होता. मात्र दोघंही एकमेकांपासून फार जवळ असल्याने त्यांचा योग्यरितीने जन्म झाला आहे.
या जुळ्यांची आई विकी प्लॉराईट म्हणते की ‘गरोदरपणाच्या १० व्या आठवड्यात सोनोग्राफीमध्ये मला कळालं की माझ्या पोटात जुळ्यांची वाढ होत आहे. मात्र दोघांचीही वाढ एकाच पिशवीत होत असल्याने त्यांच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आलं होतं.’ खरंतर प्रसुतीदरम्यान काही अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे त्यांची नैसर्गिकरित्या प्रसुती होणं जरा कठीण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिवाय जन्मानंतर दोन्ही बाळं वाचू शकतील की नाही याचीच खात्री डॉक्टरांना नव्हती. त्यामुळे जुळ्यांची आई फार घाबरली. हा प्रकार फार दुर्मिळ असून अशा प्रसुतीसाठी अनुभवी आणि हुशार डॉक्टरांचीच गरज असते. त्यामुळे त्यांनी एका प्रसिद्ध डॉक्टरांचा सल्ला घेण्याचा विचार केला.
त्यानंतर शहरातल्या हॉस्पिटलमध्ये पुढील तपासणीसाठी विकी यांनी धाव घेतली. तेथील डॉक्टरांनाही हे सारं पाहून धक्काच बसला. शिवाय सोनोग्राफीमध्ये स्पष्ट दिसत होतं की, दोन्ही बाळांनी एकमेकांना घट्ट पकडलेलं आहे. पण तेथील डॉक्टरांनी सांगितलं की ‘बाळांनी एकमेकांना घट्ट पकडल्यामुळे त्यांची प्रसुती व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही त्यांच्या जगण्याची आशा केवळ ५० टक्केच होती.’ अशा परिस्थितीत त्या प्रत्येक दोन आठवड्यांनी तपासणी करत होत्या. डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांच्यावर योग्य उपचार सुरू होते. शेवटी २२ डिसेंबर २०१५ साली त्यांची प्रसुती झाली. आता दोघेही बाळ अगदी सुरक्षित असून सदृढ आहेत. नुकताच त्यांना २२ महिने पूर्ण झाल्याने ही बातमी पुन्हा एकदा समोर आली आहे.