इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:18 IST2024-05-05T16:17:50+5:302024-05-05T16:18:59+5:30
UK Britain heaviest man Jason Holton dies: जेसन दररोज सामान्य माणसापेक्षा ४ पट म्हणजे दिवसाला १० हजार कॅलरी असलेले अन्न खात होता

इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
UK Britain heaviest man Jason Holton dies: ब्रिटनमधील सर्वात वजनदार माणूस म्हणून ओळखला जाणारा जेसन हल्टन याचे ४ मे रोजी निधन झाले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थूलत्व आणि शरीरातील अनेक अवयव निकामी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. जेसनवर उपचार सुरु होते, पण त्याचे अवयव उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्याला वाचवता आले नाही. जेसन 33 वर्षांचा असून त्याचे वजन 318 किलो होते. आठवड्याभरानंतर जेसनचा 34 वा वाढदिवस होता. पण त्याआधीच त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली.
जेसनला सरे काउंटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अग्निशमन दलाच्या 6 बंबांच्या मदतीने त्याला त्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. जेसनची आई लिसा यांनी हॉस्पिटलमध्ये त्याची खूप काळजी घेतली. जेसनचा मृत्यू होणार असल्याचे डॉक्टरांनी आठवड्याभरापूर्वीच सांगितले होते तसेच जेसनची किडनी पूर्णपणे निकामी झाली होती. त्यामुळे त्याची प्रकृती दिवसेंदिवस गंभीर होऊ लागली होती, अशी माहिती लिसा यांनी दिली.
शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे जेसनचे अवयव निकामी झाले. जेसनला किडनी डायलिसिस आणि आयव्ही ड्रिपवर ठेवण्यात आले होते, परंतु असे असूनही त्याचे सर्व अवयव हळूहळू निकामी होऊ लागले. जेसन एका सामान्य माणसापेक्षा 4 पट जास्त म्हणजे एका दिवसात सुमारे 10,000 कॅलरीज खात असे. 2022 मध्ये, जेसनला अनेक वेळा स्ट्रोक येणे किंवा रक्त गोठणे अशा त्रासांचा सामना करावा लागला. त्याचप्रमाणे तो 2020 साली पडला होता, त्यावेळी अग्निशमन दलाचे ३० हून अधिक कर्मचारी आणि अभियंते यांच्या पथकाने मिळून सुमारे ७ तासांच्या अथक परिश्रमानंतर क्रेनच्या सहाय्याने त्याला अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरून विमानातून बाहेर काढले होते. अखेर स्थूलत्व आणि अवयव निकामी पडल्याने काल त्याचा मृत्यू झाला.