अजबच! या व्यक्तीच्या छातीतच आहे त्याच पोट, आयुष्यभर राहिली श्वासाची समस्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 09:41 AM2023-09-05T09:41:58+5:302023-09-05T10:05:16+5:30
केन प्रोउट यांनी आपलं पूर्ण आयुष्य श्वास घेण्याच्या समस्येत घालवलं. ते आजही मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाहीत.
जगातल्या प्रत्येक गोष्टीची निर्मिती निसर्गाने फारच खास बनवली आहे. सगळ्या जीवांना या जगात जगता आलं पाहिजे यासाठी त्यांना काही खास सुविधा दिल्या आहेत. पण अनेकदा अशा काही केसेस बघायला मिळतात, ज्याबाबत वाचून हैराण व्हायला होतं. यूकेमधील केन प्रोउट यांनी आपलं पूर्ण आयुष्य श्वास घेण्याच्या समस्येत घालवलं. ते आजही मोकळेपणाने श्वास घेऊ शकत नाहीत. त्यांना श्वासासंबंधी कोणतीही समस्या नाही, पण त्यांच्या छातीतच त्यांचं पोट आहे.
72 वर्षीय केन यांना नेहमीच श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांना कळतंच नव्हतं की, नेमकी समस्या काय आहे? त्यांनी अनेक डॉक्टरांना दाखवलं. अनेक औषधं घेतली. पण त्यांना आराम काही मिळाला नाही. शेवटी जेव्हा त्यांच्या शरीराला स्कॅन करण्यात आलं तेव्हा समजलं की, त्यांना फ्रेनिक नर्वची समस्या आहे. या शरीरातील रेस्पिरेट्री मसल्स डॅमेज होतात. आता त्यांना एक मोठी सर्जरी करावी लागणार आहे. जेणेकरून त्यांच्या लंग्सची क्षमता वाढावी.
जगणं झालं होतं अवघड
केन यूकेतील रॉयल एयर फोर्सचा भाग होते. त्यांना श्वास घेण्यास आयुष्यभर समस्या झाली. इतक्या वर्षात त्यांना या समस्येचं कारणच समजलं नाही. आता त्यांना समजलं की, त्यांच्या छातीमध्येच त्यांचं पोट आहे. त्यामुळे त्यांच्या लंग्सना जास्त स्पेस मिळत नाही. ज्यामुळे समस्या होत होती.
केन यांनी सांगितलं की, समस्या समजल्यावर ते जरा नर्वस झाले. आता त्यांच्या लक्षात आलं की, त्यांना श्वास घेण्यास समस्या का होत होती. सर्जरी करण्याआधी केन यांनी त्यांची समस्या लोकांसोबत शेअर केली.
केन यांचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं की, त्यांचा अर्धा डायाफ्राम काम करत नाही. सोबतच छातीमध्ये पोट असल्या कारणाने जेवणही व्यवस्थित पचत नाही. त्यांनी त्यांचं अर्ध आयुष्य श्वासासंबंधी समस्येत आणि उलट्या करण्यात घालवलं आहे. पण ही समस्या असूनही त्यांनी रॉयल एयर फोर्सला सर्विस दिली. आता त्यांच्या ऑपरेशनची पूर्ण तयारी झाली आहे. यानंतर ते मोकळेपणाने श्वास घेऊ शकतील.