रात्री झोपताना काही नव्हतं, सकाळी पोट दिसलं... ४५ मिनिटांत झाली आई!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 8, 2019 03:51 PM2019-04-08T15:51:38+5:302019-04-08T15:56:52+5:30
एका रात्री ती नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली. तिला जराही कल्पना नव्हती की, ती गर्भवती आहे. पण जेव्हा सकाळी उठली तर तिचं सामान्य पोट 'बेबी बंप' मध्ये रुपांतरित झालं.
(Image Credit : metro.co.uk)
ब्रिटनची एक १९ वर्षीय तरुणीसोबत एक विचित्र घटना घडली आहे. एका रात्री ती नेहमीसारखी सामान्यपणे झोपायला गेली. तिला जराही कल्पना नव्हती की, ती गर्भवती आहे. पण जेव्हा सकाळी उठली तर तिचं सामान्य पोट 'बेबी बंप' मध्ये रुपांतरित झालं. आणि त्यानंतर केवळ ४५ मिनिटांमध्येच तिने एका सुदृढ बाळाला जन्म दिला.
१७ जुलै २०१८ ची ही घटना आहे. एम्मलुइस लेगेट असं या तरुणीचं नाव आहे. तिने सांगितले की, हा तिच्या आयुष्यातील सर्वात धक्कादायक क्षण होता. जेव्हा ती झोपेतून उठली तेव्हा तिला काहीच सुचत नव्हतं. त्यामुळे तिने लगेच आईला बोलवलं. नंतर तिची आजी लुइस सुद्धा तिथे आली. लुइस सांगतात की, 'मी जसं तिच्याकडे पाहिलं, मला हे कळालं होतं की, ती गर्भवती आहे. त्यानंतर ते एम्मलुइसला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. पुढच्या केवळ ४५ मिनिटात माझ्या नातीने एका मुलीला जन्म दिला'.
एम्मलुइस सांगते की, कारमधून हॉस्पिटलला जात असताना तिला वेदनाही होत होत्या. हॉस्पिटलच्या दारात पोहोचताच आणि कारचा दरवाजा उघडताच तिने बाळाला जन्म दिला होता. ती सांगते की, 'मला फक्त इतकं आठवतं की, मला त्यावेळी मासिक पाळी आली नव्हती. मला वाटलं की, प्रेग्नन्सी पिल्समुळे असं झालं असावं. त्याशिवाय गर्भवती असण्याचे कोणतेही लक्षणं मला दिसत नव्हते आणि मला कधी तसं काही जाणवलं देखील नाही'.
एम्मलुइस सांगते की, 'माझं पोट अजिबात वाढलं नव्हतं. हा, माझं थोडं वजन वाढलं होतं. मी आईकडे वाढत्या वजनाची नेहमी तक्रारही करत होते. यावर त्यांनी मला फिरायला जाण्याचा सल्ला दिला. वजन वाढल्यावर माझ्या पोटाचा भाग सामान्यच होता'.
एम्मलुइस दुसऱ्यांदा आई झाली होती. तिला आधीही एक मुलगा आहे. ती सांगते की, 'आई होतानाचे मानसिक आणि शारीरिक बदल चांगलेच माहीत होते. पण जेव्हा कियाराचा जन्म झाला तेव्हा असं काहीच जाणवलं नाही'. यावर डॉक्टरांनी सांगितले की, अनेकदा बाळ गर्भाशयाच्या खालच्या म्हणजेच पाठिच्या खालच्या भागात असतात. त्यामुळे पोट दिसून येत नाही. असं होणं सामान्य आहे.