दोन्ही पाय गेले, तरीही स्वत:च्या लग्नात डान्स
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 05:08 PM2022-05-11T17:08:58+5:302022-05-11T17:09:43+5:30
Ukrainian nurse : इतक्या वर्षांचा रेंगाळलेला हा सुवर्णयोग मात्र आला आता या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये! या दोघांनी हॉस्पिटलमध्येच लग्न केलं.. यावेळी दोघंही जितके भावुक झाले होते, तितकेच आनंदी.
युक्रेनच्या लुहान्स प्रांतातील ही घटना. साधारण महिनाभरापूर्वी घडलेली. ओक्साना बालांदिना ही २३ वर्षांची तरुणी हॉस्पिटलमधलं आपलं काम आवरून घरी जात होती. ती नर्स आहे. तिच्याबरोबर तिचा प्रियकर व्हिक्टर वासिलोव हादेखील होता. ओक्साना थाेडी पुढे चालत होती आणि तिच्या काही पावलं मागे व्हिक्टर. काय झालं, कोणालाच काही कळलं नाही; पण अचानक स्फोटाचा मोठा आवाज झाला, ओक्सानानं एक किंकाळी फोडली आणि ती हवेत उंच उडाली. थोड्या दूर अंतरावर रक्ताच्या थारोळ्यात जाऊन पडली. तिच्या डोक्याला जबर मार लागला होता आणि तिच्या पायांच्या तर चिंधड्या झाल्या होत्या. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. आपल्या प्रियकराला उद्देशून ओक्साना फक्त एक शब्दच बोलू शकली.. ‘हनी, लूक!’..
ज्या ठिकाणाहून हे दोघंही चालले होते, त्या भागावर आता रशियानं कब्जा केला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले आहेत. त्यातल्याच एकावर ओक्सानाचा पाय पडला होता आणि ती मृत्यूच्या दारात जाऊन पोहोचली होती.. सुदैवानं व्हिक्टरला काहीही झालं नाही. तो बालंबाल बचावला. अचानक झालेल्या या स्फोटानं तोही हादरला. काय करावं हेदेखील त्याला कळेना. तो एकदम सुन्न झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आपली लाडकी प्रेयसी जिवंत आहे की मृत, याचाही अंदाज त्याला येईना.
धक्क्यातून सावरल्यावर आणि भानावर आल्यावर त्यानं ओक्सानाला तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सुदैवानं ओक्साना वाचली; पण तिचे दोन्ही पाय आणि डाव्या हाताची चार बोटं कापून टाकावी लागली.. २७ मार्च २०२२ ला हा अपघात झाला. त्या दिवसापासून ओक्साना हॉस्पिटलमध्येच आहे आणि तिला सोबत करतोय, तिची जिवापाड काळजी घेतोय, भावी आयुष्याची दोघांनी मिळून पाहिलेली स्वप्नं तिच्यात जागवतोय तो तिचा प्रियकर व्हिक्टर. खरं तर या दोघांचंही नातं तसं अतिशय जुनं. गेल्या अनेक वर्षांपासून, म्हणजे टिनएजमध्ये असल्यापासून ते प्रेमात आहेत आणि त्यांना दोन मुलंही आहेत. ओक्साना आणि व्हिक्टर यांची
जेव्हा पहिल्यांदा भेट झाली, त्याच वेळी त्यांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या, एकमेकांना कधीही अंतर देणार नाही याचा विश्वास एकमेकांमध्ये जागवला; पण कुठल्या ना कुठल्या कारणानं त्यांना लग्न करायला वेळच मिळाला नाही. कोरोना सुरू व्हायच्या आधीही त्यांनी लग्नाचं नक्की केलं होतं; पण काेरोनामुळे पुन्हा सगळं बारगळलं.
इतक्या वर्षांचा रेंगाळलेला हा सुवर्णयोग मात्र आला आता या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये! या दोघांनी हॉस्पिटलमध्येच लग्न केलं.. यावेळी दोघंही जितके भावुक झाले होते, तितकेच आनंदी. ओक्सानाला दोन्ही पाय गमवावे लागलेले आहेत, अजून काही महिने तिला हॉस्पिटलमध्ये काढावे लागणार आहेत, तरी आपल्या लांबलेल्या या लग्नसोहळ्यात दोघांनी डान्सही केला. व्हिक्टरनं आपल्या दोन्ही हातांत तिला उचलून घेतलं होतं. हा व्हिडिओ जगभरात व्हायरल होतो आहे. हा सोहळा ज्यांनी ज्यांनी पाहिला, त्यातल्या कोणालाही आपल्या डाेळ्यांतलं पाणी आवरता आलं नाही..
अनेकदा असं दिसतं की, जेव्हा असा काही अपघात होतो, कायमचं अपंगत्व येतं, तेव्हा प्रियकर किंवा प्रेयसी आपलं प्रेमाचं नातं विसरतात आणि दुसरा जोडीदार पाहून त्याच्याशी लग्नगाठ बांधतात. व्हिक्टरनं मात्र असं काहीही केलं नाही. अपघातानंतर प्रत्येक कठीण प्रसंगात तो ओक्सानाच्या पाठीशी उभा राहिला. तिच्यातला आत्मविश्वास जागवला, तिच्यात पुन्हा हिंमत निर्माण केली आणि पहिल्यांदा आपलं लांबलेलं लग्न उरकून घेतलं.
व्हिक्टर म्हणतो, ‘‘असल्या कुठल्याही ‘किरकोळ’ घटनांनी विफल होण्याइतकं आमचं प्रेम कमकुवत नाही. ओक्साना कुठल्याही परिस्थितीत मला हवी आहे. अपघातात तिचे फक्त पाय गेलेत, पण ती होती, तशीच तर आहे. अजूनही तितकीच सुंदर, प्रेमळ, हिंमतवान. नर्स म्हणून अनेकांचे प्राणही तिनं वाचवले आहेत. तिच्या हिमतीला मी सलाम करतो. पहिल्यापासून तिचं एकच म्हणणं होतं, कोणावर ओझं होऊन आपण जगायचं नाही.. पण आजही, ती माझ्यासाठी काय, कोणासाठीच ओझं होऊ शकत नाही..’’
ओक्साना म्हणते, ‘‘मी मृत्यूला घाबरत नाही. आजवर घाबरले नाही, पण या अवस्थेत मात्र मला कधीही जगायचं नव्हतं. शिवाय मुलांनी मला या अवस्थेत पाहावं, असंही मला वाटत नव्हतं. त्यामुळे जगण्यातला माझा रस संपला होता, पण व्हिक्टर माझ्या मागे भक्कमपणे उभा राहिला आणि आमच्या आयुष्यातली स्वप्नं त्यानं मला पुन्हा एकदा दाखवली... आता मला जगायचं आहे.’’
‘मी पुन्हा चालेन, नाचेन’!
ओक्सानाला मात्र आता आपल्या देशात राहायचं नाही. आपल्या मुलांचं काय होईल याची भीती तिला वाटतेय. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आता जर्मनीला स्थलांतरित होणार आहे. तिथे तिच्या पायांवर पुन्हा शस्त्रक्रिया होऊन कृत्रिम पाय तिला बसवले जातील. त्या पायांनी आपण पुन्हा चालायला, नाचायला लागू असा तिला विश्वास आहे..