एका भन्नाट लग्नाची गोष्ट! मुलीच्या लग्नात आईनेही उरकलं लग्न, आधी केलं कन्यादान नंतर स्वत:च्या नव्या संसाराला केली सुरूवात...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 11:05 AM2020-12-14T11:05:47+5:302020-12-14T11:07:05+5:30
उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हे लग्न अनोखं लग्न पार पडलं. आईने आधी मुलीचं कन्यादान केलं नंतर स्वत: सप्तपदी घेतली.
लग्न म्हटलं की, आनंदाचं वातावरण, धावपळ, दु:खं या गोष्टी आल्याच. पण यासोबतच लग्नात काही विचित्र घटनाही घडतच असतात. एका मांडवात दोन बहिणींचं लग्न झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल. इतकंच काय तर दोन भावांचंही एका मांडवात लग्न झालेलं पाहिलं असेल. पण तुम्ही कधी मुलीचं आणि तिच्या आईचं लग्न एकाच मांडवात झालेल पाहिलं का? अर्थातच यावर तुमचं उत्तर नाही असेल. पण अशी आश्चर्यकारक आणि कौतुकास्पद म्हणावी अशी घटना समोर आली आहे.उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये हे लग्न अनोखं लग्न पार पडलं. आईने आधी मुलीचं कन्यादान केलं नंतर स्वत: सप्तपदी घेतली.
नवभारत टाइम्सच्या रिपोर्टनुसार, गोरखपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका सामूहिक विवाह सोहळ्यात ही घटना घडली. यात ६३ जोडप्यांचं एकत्र लग्न लागणार होतं. ज्यात पिपरॉलीच्या रहिवाशी बेला देवी यांच्या मुलीचंही लग्न होणार होतं. त्यांच्या इंदू नावाच्या मुलीचं राहुल नावाच्या मुलाशी लग्न ठरलं होतं. या सोहळ्यात बेला देवी यांनी आधी मुलीचं लग्न लावलं. नंतर त्या नवरी बनून आल्या आणि त्याच मांडवात त्यांनाही लग्न केलं. कदाचित अशाप्रकारची ही पहिलीच घटना असावी.
बेला देवी यांच्या पतीचं 25 वर्षांपूर्वी निधन झालं होतं त्यांनी. त्यांनी एकूण पाच मुले म्हणजे दोन मुलं आणि तीन मुलींचा एकटीने सांभाळ केला. चौघांची लग्ने आधीच झाली होती. सामूहिक विवाह सोहळ्यात सर्वात लहान मुलगी इंदूचंही लग्न लावून दिलं. पण आता त्या एकट्या पडणार होत्या. पण त्यांनी पुढील आयुष्य जगण्यासाठी जोडीदार निवडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ५५ वर्षीय दीर जगदीश यांच्यासोबत लग्न केलं.
बेला देवी यांचा दीर अविवाहित होता. आणि बेला देवी सुद्धा आता एकट्या पडणार होत्या. त्यामुळे त्यांनी सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला. या अनोख्या लग्नाची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे.