ऐकावं ते नवलंच; चंद्र-मंगळावरुन आलेल्या उल्कापिंडापासून बनले अनोखे घड्याळ, किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 09:10 PM2023-10-02T21:10:23+5:302023-10-02T21:11:26+5:30
महागडी घड्याळे बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडच्या कंपनीने हे अनोखे घड्याळ बनवले आहे.
हातात घड्याळ घालण्याचा ट्रेंड फार पूर्वीपासून चालत आला आहे. कोणी 100-200 रुपयांचे घड्याळ घालतो, तर कोणी लाखोंचे घड्याळ घालतो. जगात अशी अनेक घड्याळे आहेत, ज्यांची किंमत लाखो करोडोंमध्ये आहे. त्याचे कारण म्हणजे, त्यात सोने आणि हिरे जडलेले असतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा घड्याळाबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये अशा गोष्टी जडलेल्या आहेत, ज्याबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.
स्वित्झर्लंडची एक घड्याळ बनवणारी कंपनी लेस एटेलियर्स लुई मोइनेट, अनोखे आणि महागडी घड्याळे बनवण्यासाठी जगभर प्रसिद्ध आहे. या कंपनीने आतापर्यंत असे अनेक घड्याळ बनवले आहेत, ज्याचा कुणी विचारही केला नसेल. याच कंपनीने एक अनोखे घड्याळ बनवले आहे, ज्यात चक्क 12 उल्कापिंडांचा वापर करण्यात आला आहे. या उल्का चंद्र आणि मंगळासह आणि अवकाशातील विविध ताऱ्यांपासून पृथ्वीवर पडलेल्या आहेत.
घड्याळाची किंमत 2 कोटींहून अधिक
या दुर्मिळ आणि अनोख्या घड्याळाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात आला आहे. या घड्याळाला ‘कॉस्मोपॉलिस’ असे नाव देण्यात आले आहे. या घड्याळाची किंमतही धक्कादायक आहे. कंपनीने त्याची किंमत 2 कोटींहून अधिक ठेवली आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने सोशल मीडियावर या घड्याळाशी संबंधित एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये उल्कापिंडांचे तुकडे दिसत आहेत.