उतावळ्या नवरदेवाने स्टेजवर नवरीला केलं KISS, पाहुण्यांसोबत त्याचीही केली गेली 'धुलाई'!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 01:36 PM2024-05-22T13:36:42+5:302024-05-22T13:38:18+5:30
नवरदेवाने लग्नात असं काही केलं की, लाठी काठ्यांनी त्याला आणि त्याच्या पाहुण्यांना मार बसला.
सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात सोशल मीडियावर लग्नातील अनेक अतरंगी व्हिडीओ किंवा घटना व्हायरल होत असतात. कधी नवरी लग्नाच्या वेळेवर पळून जाते तर कधी नवरदेव गुटखा खातो म्हणून लग्न मोडते. तर कधी नवरदेव एखाद्या कारणाने लग्न मोडतो. अनेकदा लग्नातील भांडणांच्याही घटना समोर येतात. अशीच एक घटना यूपीच्या हापूडमधून समोर आली. इथे नवरदेवाने लग्नात असं काही केलं की, लाठी काठ्यांनी त्याला आणि त्याच्या पाहुण्यांना मार बसला.
नवरीकडील लोकांनी केवळ नवरदेवच नाही तर त्याच्या पाहुण्यांचीही चांगली धुलाई केली. नंतर नवरदेवाकडील लोकांनीही दगडफेक केली. अशात लग्न मंडपी एकच गोंधळ उडाला. बरेच लोक जखमी झाले. आता हे प्रकरण पोलिसात गेलं आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, येथील अशोकनगरमध्ये लग्न सुरू होतं. हार टाकण्याच्या रिवाजावेळ नवरदेवाने स्टेजवरच सगळ्यांसमोर नवरीला किस केलं. नवरदेवाच्या या वागण्यावर नवरीकडील लोक भडकले आणि त्यांनी नवरदेवासोबतच त्याच्या पाहुण्यांनाही मारहाण सुरू केली.
काही वेळातच दोन्हीकडील पाहुणे एकमेकांना मारू लागले. लाठ्याकाठ्या जे हाती सापडेल त्याने ते एकमेकांना मारत होते. यात नवरीकडील 6 लोक जखमी झाले. घटनेची सूचना पोलिसांना देण्यात आली. तर जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. हा सगळा प्रकार झाल्यानंतर नवरदेवाला वरात परत घेऊन जावी लागली.
या घटनेबाबत नवरीच्या वडिलांनी सांगितलं की, "सोमवारी रात्री त्यांच्या दोन मुलीचं लग्न होतं. मोठ्या मुलीचं लग्न आधी शांतपणे पार पडलं. पण लहान मुलीच्या लग्नावेळी वाद झाला. नवरदेवाने जबरदस्तीने नवरीला किस केलं. यावरून घरातील लोक भडकले आणि दोन्हीकडील लोकांमध्ये हाणामारी झाली".
पोलिसांनी काही लोकांना अटक केली. याप्रकरणी एसपी अभिषेक शर्मा यांनी सांगितलं की, लग्नात गोंधळ झाल्याची माहिती मिळाली होती. सध्या याबाबत दोन्हीकडून काही तक्रार दाखल करण्यात आली नाही. तक्रार मिळाली तर कारवाई केली जाईल.