लय भारी! देशातील 'या' छोट्याशा गावाची गोष्टच न्यारी; प्रत्येक घरात आहेत IAS, IPS अधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2022 04:35 PM2022-11-05T16:35:39+5:302022-11-05T16:41:23+5:30
गावातील लोकांना देशभरात मोठ्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे.
देशभरातील अनेक तरुण आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न घेऊन दिवसरात्र मेहनत करतात. मेहनतीनंतर काहींची स्वप्न पूर्ण होतात. देशातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाणारी यूपीएससी परीक्षा कोणी पास केली, तर त्याची चर्चा आजूबाजूच्या परिसरात सुरू होते. देशात एक असं गाव आहे ज्या गावाला IAS ची फॅक्टरी म्हणतात. कारण या गावाने देशाला अनेक मोठे अधिकारी दिले आहेत. या गावाचे किस्से जगभर ऐकायला मिळतात. गावातील जवळपास प्रत्येक घरातून अधिकारी बाहेर पडतात.
उत्तर प्रदेशच्या जौनपूर जिल्ह्यात माधोपट्टी हे गाव आहे. या गावातील लोकांना देशभरात मोठ्या पदांवर नियुक्त करण्यात आले आहे. गावाच्या इतिहासाविषयी माहिती देताना गावातील रहिवासी राहुल सिंह सोलंकी म्हणाले की, या गावात सुमारे 75 घरे आहेत. गावातून मोठ्या पदांवर 51 जणांची नियुक्ती झाली आहे. तसेच गावातील 40 लोक आयएएस, पीसीएस आणि पीबीएस अधिकारी आहेत. याशिवाय या गावातील लोक इस्रो, भाभा आणि वर्ल्ड बँकेतही कार्यरत आहेत.
1952 मध्ये माधोपट्टी गावातून डॉ. इंदुप्रकाश पहिल्यांदा आयएएस झाले. त्यांनी यूपीएससीमध्ये दुसरा क्रमांक पटकावला. डॉ इंदुप्रकाश फ्रान्ससह अनेक देशांचे राजदूत राहिले आहेत. डॉ इंदुप्रकाश यांच्यानंतर त्यांचे चार भाऊ आयएएस अधिकारी झाले.
विनय कुमार सिंह यांनी 1955 साली आयएएस परीक्षेत 13 वा क्रमांक मिळवला होता. ते बिहारचे मुख्य सचिव राहिले आहेत.
छत्रसाल सिंह यांनी 1964 मध्ये IAS परीक्षा उत्तीर्ण केली. ते तामिळनाडूचे मुख्य सचिव राहिले आहेत.
अजय सिंह 1964 मध्ये IAS देखील झाले.
शशिकांत सिंग 1968 मध्ये आयएएस अधिकारी बनले. हे लोक गावातील पहिले आयएएस अधिकारी होते.
डॉ इंदुप्रकाश यांच्या चार भावांनंतर त्यांची दुसरी पिढीही UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊ लागली. 2002 मध्ये डॉ इंदुप्रकाश यांचा मुलगा आयएएस झाला. या परीक्षेत त्याला 31 वा क्रमांक मिळाला. त्याच वेळी, 1994 मध्ये त्याच कुटुंबातील अमिताभ सिंह देखील आयएएस झाले. ते नेपाळचे राजदूत राहिले आहेत.
महिलाही होताहेत अधिकारी
माधोपट्टी गावातून केवळ पुरुषच अधिकारी झाले नाहीत, तर मुली आणि सुनांनीही झेंडा रोवला. 1980 मध्ये आशा सिंह, 1982 मध्ये उषा सिंह आणि 1983 मध्ये इंदू सिंह या गावातील अधिकारी बनल्या. गावातील अमिताभ सिंह यांच्या पत्नी सरिता सिंह याही आयपीएस अधिकारी झाल्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतते वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"