राम मंदिरासाठी ८८ वर्षीय आजींचा २८ वर्षांचा अन्नत्याग! भूमिपूजनाच्या दिवशी व्रत सोडणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 08:19 PM2020-08-04T20:19:33+5:302020-08-04T20:22:36+5:30
८८ वर्षीय उर्मिला अद्यापही निमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून उर्मिला राम मंदिर निर्माणाची वाट पाहत आहेत. तेसुद्धा अन्नाचा त्याग करून.
उत्तर प्रदेशातीलअयोध्यानगरीत लवकरच भव्य श्री राम मंदिर निर्माण होणार आहे. बुधवारी ५ ऑगस्टला राम जन्म भूमी पूजन होणार आहे. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे या क्षणाची भव्यता काही अंशी कमी वाटत असली तरी उत्साहात कोणतीच कमतरता जाणवत नाही. या ऐतिहासिक क्षणासाठी अयोध्या नगरीला सजवलं गेलं आहे. या भूमिपूजन सोहळ्यासाठी देशातील अनेक साधु-संतांना, नेत्यांना आमंत्रित करण्यात येणार आहे.
येथील रस्त्यांवर दुतर्फा रोषणाई करण्यात आली आहे, रांगोळ्या काढल्या गेल्या आहेत, येथील भिंतीही सजवल्या गेल्या आहेत. ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराचं भूमीपूजन पार पडणार आहे. यानिमित्ताने राममंदिरासाठी अनेक वर्ष तहान भूक विसरलेल्या एका आजींबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. भूमीपूजन सोहळ्यासाठी २०० लोकांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे.
जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८८ वर्षीय उर्मिला अद्यापही निमंत्रणाच्या प्रतिक्षेत आहेत. तुमचा विश्वास बसणार नाही पण गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून उर्मिला राम मंदिर निर्माणाची वाट पाहत आहेत. तेसुद्धा अन्नाचा त्याग करून. उर्मिला चतुर्वेदी यांनी गेल्या २८ वर्षांपासून फक्त फलाहार घेतला आहे. राममंदिराच्या प्रतिक्षेत अन्नत्याग करून त्यांनी आपल्या आयुष्यातील मोठा काळ व्यतीत केला आहे.
आता ५ ऑगस्ट रोजी राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनासोबतच आपलं व्रत तोडण्याचा निर्णय उर्मिला यांनी घेतल्यानं त्यांच्या घरात उत्साहाचं वातावरण आहे. १९९२ साली कारसेवकांनी वादग्रस्त बांधकाम पाडल्यानंतर मोठा संघर्ष घडला होता. तेव्हा उर्मिला चतुर्वेदी यांना प्रचंड दुःख झाल्यानं त्यांनी अन्नग्रहण करणं सोडले. अयोध्येत भूमिपूजन सोहळ्यासाठी 'श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट'कडून अनेक खास पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येतंय. पण उर्मिला चतुर्वेदी यांना आमंत्रण मिळालेलं नाही. अशा स्थितीत उर्मिला कुटुंबियांकडे भूमिपूजनाला जाण्यासाठी हट्ट करत आहेत. परंतू लॉकडाऊनमुळे हे शक्य नसल्यानं त्यांना भूमिपूजनास येणं कठिण झालं आहे.
उर्मिला यांच्या कुटुंबियांनी माध्यामांना दिलेल्या माहितीनुसार उर्मिला यांनी लवकर अन्न ग्रहण सुरू करावं, असं त्यांचं म्हणणं आहे. २८ वर्षांत त्यांना अनेक कठीण प्रसंगांना तोंड द्यावं लागले आहे. अन्नत्याग केल्यानं उर्मिला या आपले नातेवाईक आणि समाजापासूनही दूरावल्याचं त्यांचे कुटुंबीयांनी सांगितले. अजूनही उर्मिला यांनी अयोध्येतच राहून आपलं उर्वरित आयुष्य श्रीरामांच्या सेवेत घालवण्याचा विचार केला आहे.
बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर