शाकाहऱ्यांनो आता बिनधास्त खा वेज चिकन, बाजारात आल्या 'वेगन' चिकन विंग्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:22 PM2022-04-06T17:22:33+5:302022-04-06T17:24:33+5:30
आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत जी वाचल्यानंतर तुम्ही निर्धास्तपणे चिकन विंग्जचा (Chicken Wings) आनंद घेऊ शकाल.
भारताची खाद्यसंस्कृती अतिशय मोठी आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ आवडणारे अनेक खाद्यप्रेमी आहेत. शाकाहारी, मांसाहारी आणि व्हेगन अशा प्रकारांत या खाद्यप्रेमींची गणना केली जाऊ शकते. अनेक व्यक्ती मांसाहार करणाऱ्या (Non Veg Lovers) असतात. परंतु अनेकदा त्यांना वेगवेगळ्या कारणांमुळे आपलं आवडतं खाद्य घेणं टाळावं लागतं. अनेकदा एखाद्या फ्लूची अफवा पसरली की लोक सर्वप्रथम मांसाहार बंद करतात. त्यातही बर्ड फ्लूच्या बातम्या अनेकवेळा येत असतात. परंतु, आज आम्ही तुम्हाला अशी माहिती देणार आहोत जी वाचल्यानंतर तुम्ही निर्धास्तपणे चिकन विंग्जचा (Chicken Wings) आनंद घेऊ शकाल.
मांसाहार घेणाऱ्या लोकांसाठी ही अतिशय उपयुक्त माहिती आहे. या आठवड्यात बाजारात व्हेगन चिकन विंग्ज (Vegan Wings) दाखल होणार आहेत. हे शाकाहारी विंग्ज खाल्ल्यास तुम्हाला मांसाहाराचा आनंद मिळू शकणार आहे. हे विंग्ज खाल्ल्यानंतर तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की तुम्ही मांसाहार नाही तर शाकाहार घेत आहात. या विंग्जची चव तुम्हाला अगदी चिकन विंग्जसारखी भासेल. हे विंग्ज वनस्पती आधारित स्ट्रीट फूड ब्रँड Biff's Plant Shack द्वारे बनवले जातात. यापासून बनवलेल्या विंग्जला अगदी खऱ्याखुऱ्या चिकनचा फील देण्यासाठी त्यात हाडांचाही वापर केला गेला आहे. तुम्ही हे शाकाहारी विंग्ज खाल्ल्यावर तुमच्या तोंडाला पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
हे विंग्ज फणसापासून बनवले जातात. याशिवाय यामध्ये मशरूम, गाजर, औषधी वनस्पती आणि मसाल्यांचा वापर केला जातो. या शाकाहारी विंग्जमध्ये आढळणाऱ्या हाडांविषयी सांगायचं झाल्यास ती उसापासून बनवली जातात. फणसाच्या मिश्रणाच्या मध्यभागी दाबून त्यावर ब्रेडक्रम्स लावून ती बनवली जातात. ती दिसायलादेखील चिकन विंग्जप्रमाणे आहेत. हे खाताना तुम्हाला असं वाटू शकतं, की चिकन उत्तमरीत्या बारीक करून त्यापासून हे कबाब बनवले आहेत; मात्र प्रत्यक्षात तो केवळ फणसाचा पदार्थ आहे.
हे व्हेगन चिकन विंग्ज लवकरच बाजारात दाखल होणार आहेत. त्यानंतर तुम्हाला त्याचा आनंद घेता येईल. रिपोर्टनुसार, दर वर्षी अनेक अब्ज चिकन विंग खाल्ले जातात. काही जणांना वेगवेगळ्या कारणांमुळे मांसाहार सोडावा लागतो. परंतु आता फणसापासून बनवलेल्या या विंग्जमुळे अशा खाद्यप्रेमींना मांसाहार सोडावा लागला तरी मांसाहाराचा फील देणारं खाद्य खाता येईल. या आठवड्यात यूकेच्या रेस्टॉरन्टमध्ये हे विंग्ज लॉन्च केले जाणार आहेत. त्यानंतर काही कालावधीत अन्य ठिकाणीदेखील ती लॉन्च केली जातील. यानंतर मांसाहार आणि शाकाहार घेणाऱ्या सर्व लोकांना या विग्जची चव चाखायला मिळणार आहे.