व्हिडीओ- कपड्यांवरून ठरतो चिमुरड्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन !
By admin | Published: June 30, 2016 07:27 AM2016-06-30T07:27:29+5:302016-07-01T01:26:22+5:30
मुलांमध्ये श्रीमंती आणि गरिबीवरून भेदभाव केला जातो, याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ युनिसेफनं प्रसिद्ध केला आहे.
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. 30- मुलं म्हणजे देवाघरची फुलं असं नेहमीच म्हटलं जातं. लहानग्यांची निरागसता अनेकांना भावते. मात्र अजूनही मुलांमध्ये श्रीमंती आणि गरिबीवरून भेदभाव केला जातो, याचा हृदयस्पर्शी व्हिडीओ युनिसेफनं प्रसिद्ध केला आहे.
जॉर्जिया या देशाची राजधानी असलेल्या टबिलीसीच्या रस्त्यावर अनानो नावाची एक 6 वर्षांची गोंडस मुलगी हरवते. अनेक जण रस्त्यावर उभ्या असलेल्या अनानोला तू हरवली आहेत का, तू ठीक आहेस का असे प्रश्न विचारत होते. एका माणसानं तर चक्क मदतीसाठी खिशातून फोनही काढला. मात्र त्याच अनानोचा मेकओव्हर करून तिला घाणेरड्या कपड्यांमध्ये रस्त्यावर उभं केलं असता तिच्याकडे आजूबाजूनं जाणारी माणसं साधी बघतही नव्हती.
याचा अनुभव रेस्टॉरन्टमध्ये अनानोला पुन्हा आला. अनानोनं चांगले कपडे घालून एका रेस्टारंटमध्ये प्रवेश केला. त्यावेळी एक महिलेनं तिला जवळ घेऊन चक्क तिची पापी घेतली. दुस-या एका माणसानं तिला पैसे देऊ केले. मात्र तीच अनानो घाणेरडे कपडे घालून रेस्टॉरंटमध्ये आली. तेव्हा ग्राहकांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. काहींनी तर तिला तिथून जायला सांगितलं. एका ग्राहकानं तिथल्या स्टाफला अनानोला रेस्टॉरंटमधून बाहेर काढण्याची विनंती केली. या सर्व प्रकारामुळे 6 वर्षांची चिमुकली अनानो खूपच निराश झाली.
"चेह-याला काजळ लावून घाणेरडे कपडे घालून मी जेव्हा त्यांच्यासमोर गेली. त्यावेळी त्यांनी मला जायला सांगितलं. त्यामुळे मी उदास झाली. ते मला का जायला सांगत होते मला माहीत नाही", असं निरागस अनानोनं म्हटलं आहे. अनानोसारखे लाखो चिमुरडे दररोज अशा यातना सहन करत असतात. एका रिपोर्टनुसार गरीब मुलं 5 वर्षांच्या आतच मृत्युमुखी पडत असल्याचंही भीषण वास्तव समोर आलं आहे.