VIDEO : या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी नाहीतर चापटा मारून घेण्यासाठी येतात लोक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:24 AM2023-12-06T10:24:15+5:302023-12-06T10:25:55+5:30
जपानच्या नागोयाचं एक रेस्टॉरंट आपल्या जेवणामुळे नाही तर एका अजब सेवेमुळे फेमस झालं आहे.
जगभरातील रेस्टॉरंट नेहमीच ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी नवनवीन काहीतरी करत असतात. ग्राहकांना चांगलं वातावरण आणि स्वादिष्ट जेवण देण्यासोबतच रेस्टॉरंटमध्ये वेगवेगळे प्रयोग केले जातात. पण जपानच्या नागोयाचं एक रेस्टॉरंट आपल्या जेवणामुळे नाही तर एका अजब सेवेमुळे फेमस झालं आहे.
शाचिहोको-या इजाकाया नावाच्या या रेस्टॉरंटची वेट्रेस ग्राहकांचं स्वागत त्यांना गालावर चापटा मारून करते. हे रेस्टॉरंट नागोयाच्या सगळ्यात लोकप्रिय नाइटलाइफ क्वार्टर निशिकी सांचोममध्ये आहे. इथे किमोनो पोषाख घातलेल्या महिला ग्राहकांच्या चेहऱ्यावर लागोपाठ चापटा मारतात. या सेवेसाठी ग्राहकांना 300 येन द्यावे लागतात.
असं म्हटलं जातं की, या रेस्टॉरंटचा बिझनेस नुकताच फार वाढला आहे. केवळ जपानी पुरूष-महिला नाहीतर परदेशातील लोकही या वेदनादायी सेवेचा अनुभव घेण्यासाठी रेस्टॉरंटमध्ये येतात.
स्थानिक मीडिया रिपोर्टनुसार, जर ग्राहकांना एखाद्या खास वेट्रेसकडून चापटा मारून घ्यायच्या असतील तर यासाठी त्यांना 500 येन द्यावे लागतात.
असं सांगण्यात येतं की, चापटा खाल्ल्यानंतर ग्राहक संतापण्याऐवजी आनंदी दिसतात. स्थानिक मीडियात असा दावा करण्यात आला की, अशा वेदनादायी अनुभवानंतर काही लोकांना शांततेची जाणीव होते.
चीनमधील मीडिया पब्लिकेशन लिबर्टी टाइम्स नेटच्या रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला की, जेवढ्या जोरात महिला कर्मचारी चापटा मारतात, ग्राहक तेवढे जास्त उत्साहित झाले. त्यांना अधिक आराम वाटला आणि चापटा मारल्यानंतर स्टाफला धन्यवाद दिले.
पण गेल्या काही दिवसांआधीच या रेस्टॉरंटने चापटा मारण्याची ही सेवा बंद केली आहे. असं सांगण्यात आलं की, सोशल मीडियावर रेस्टोरेंटचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाल्यावर स्थानिक प्रशासनाचं याकडे लक्ष गेल्याने रेस्टॉरंटने असं केलं. रेस्टॉरंटने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये लोकांना आवाहन केलं की, त्यांनी चापटा मारून घेण्यासाठी इथे येऊ नये.