हाव काही सुटली नाही; ‘हिऱ्यां’च्या शोधात गाव केलं जमीनदोस्त!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 06:46 AM2021-06-19T06:46:07+5:302021-06-19T06:46:23+5:30
काहींना गावातल्या सतल, पठारी भागातही हे ‘हिरे’ सापडले. मग काय? डोगराबरोबरच लोकांनी गावही खोदायला सुरुवात केली. हीऽऽ झुंबड उडाली.
दक्षिण आफ्रिकेतलं एक छोटंसं खेडं. क्वाझुलू नटाल क्षेत्रात येणाऱ्या या गावाचं नाव आहे क्वालाथी. गेल्या काही दिवसांपासून या गावातील हजारो लोक सतत घराबाहेरच आहेत. हातात कुदळ आणि फावडी. यात महिलाही मागे नाहीत. अख्खं गाव काय करतंय हातात कुदळ-फावडी घेऊन? तुम्हाला वाटेल गावात श्रमदानानं एखादा रस्ता, विहीर, तलाव किंवा समाजमंदिराचं काम चालू असेल! पण, तसं काहीही इथे होत नाहीए. या गावातल्या सगळ्याच लोकांना एकदम श्रीमंत व्हायचंय. तशी ‘संधी’ त्यांना अचानक उपलब्ध झालीय. त्यामुळे सगळे गावकरी, महिला, तरुण पोरं कुदळ आणि फावडी घेऊन पुढे सरसावलेत. त्यांनी तिथला अख्खा डोंगरच खणून काढायला सुरुवात केलीय. कारण या डोंगरातच त्यांचं भविष्य लपलेलं आहे, असं त्यांना वाटतंय.
काही दिवसांपूर्वी एक मेंढपाळ या डोंगरावर गेला होता. फिरता फिरता, गुरं चारता चारता अचानक त्याला एक ‘हिरा’ दिसला, थोड्या वेळानं दुसरा! तो एकदम हरखून गेला. घरी आल्यावर गावातल्या काही जणांना त्यानं ही बातमी सांगितली.. डोंगरावर हिरे सापडताहेत! आपल्याकडचे हिरे दाखवलेही. क्षणार्धात ही वार्ता गावात वाऱ्याच्या वेगानं पसरली आणि अख्खं गाव कुदळ-फावडं घेऊन डोंगराच्या दिशेनं धावलं..
आश्चर्याची गोष्ट म्हणजे यातल्या अनेकांना हे ‘हिरे’ सापडलेही. त्यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. दारिद्र्यात गेलेलं आपलं आयुष्य आता सोनं-नाणं आणि नोटांनी भरून निघेल ही आशा त्यांच्यात बळावली. ‘हिऱ्यांचा डोंगर’ म्हणून आजपासच्या गावातले लोकही कुदळ-फावडं घेऊन या डोंगरावर चाल करून गेले. जिथे पाहावे तिथे प्रत्येकाच्या हातात कुदळ-फावडे आणि मन लावून जो-तो डोंगर फोडतोय!
काहींना गावातल्या सतल, पठारी भागातही हे ‘हिरे’ सापडले. मग काय? डोगराबरोबरच लोकांनी गावही खोदायला सुरुवात केली. हीऽऽ झुंबड उडाली.
गावात हिरे सापडताहेत म्हटल्यावर सरकारनंही आपली तज्ज्ञांची टीम तिथं पाठवली आणि ‘हिऱ्यांचा शोध’ घेण्यास सांगितलं. सरकारी अधिकारीही तिथे येऊन पोहोचले. त्यांनी लोकांना खुदाईस मनाई केली. पण, लोक कसले ऐकतात! त्यांनी खुदाई चालूच ठेवली. ज्याला जसं जमेल तसं, जिथं जमेल तिथं त्यांनी हिऱ्यांच्या खजिन्याचा हा शोध सुरूच ठेवला.
दरम्यानच्या काळात काही तज्ज्ञांनी या हिऱ्यांची तपासणी केली. कठोर तपासणीनंतर त्यांनी जाहीर केलं, ‘हे हिरे नव्हेत, स्फटिकं; एक प्रकारचे दगड आहेत!’ त्याला ‘क्वार्ट्झ क्रिस्टल्स’ असं म्हणतात. पण, तज्ज्ञांनी सांगूनही लोकांचा त्यावर विश्वास बसलेला नाही. आपल्याला ‘उल्लू’ बनविण्यासाठी आणि इथली गर्दी हटविण्यासाठी आपल्याला असं सांगितलं जातंय असं त्यांना वाटायला लागलं. त्यामुळे त्यांचा विश्वास आणखीच पक्का झाला आणि हिऱ्यांच्या शोधाची मोहीम आणखीच जोरात सुरू झाली. ज्या ‘भाग्यवान’ लोकांना हे हिरे सापडलेत, त्यांनी ते विकायलाही सुरुवात केलीय. लोकांना खायला अन्न नाही, दुष्काळ, कोरोना आणि बेरोजगारीमुळे ते हवालदिल झाले आहेत, पण या ‘हिऱ्यां’नी त्यांच्या आयुष्यालाच नवी झळाळी आणली आहे. काही लोकांनी तर घरातल्या वस्तू विकून, कर्ज काढून हे ‘हिरे’ खरेदी करायला सुरुवात केली आहे. भारतीय चलनात हिशेब सांगायचा तर दोनशे रुपयांपासून सुरुवात झाली. नंतर या खड्यांचा भाव वाढत वाढत दोन हजार रुपयांपर्यंत गेला! हा सौदा फायद्याचा की घाट्याचा हे मात्र अजूनही अनेकांना कळलेलं नाही. कारण ते खरंच हिरे निघाले, तर काय घेता, म्हणून काहींनी मिळेल त्या भावात हे हिरे खरेदी करायला सुरुवात केली, तर ज्यांच्याकडे हे हिरे होते, त्यांनाही वाटायला लागलं, इतक्या स्वस्तात हे हिरे आपण विकले, तर आपल्यासारखे मूर्ख आपणच! आपण ‘कंगाल’ होऊ! त्यामुळे ‘लाखोंचे हिरे’ काही रुपयांत विकायला आता तेही तयार नाहीत. अर्थातच खरेदी करणारे आणि विकणारेही बुचकळ्यात पडलेले असले तरी त्यांच्या हातातली कुदळ-फावडी अजून सुटलेली नाही. अनेक जण अजूनही या हिऱ्यांच्या शोधात आहेत. हिऱ्यांच्या खजिन्यानं या गरीब, दरिद्री गावात अचानक नवचैतन्य आणलं, त्यांच्या डोळ्यांत श्रीमंतीची स्वप्नं पेरली आणि तात्पुरता का होईना, जगण्याचा एक नवा आशावाद त्यांच्यात पेरला हे नक्की..!
काँगोतला ‘सोन्याचा’ डोंगर!
मध्य आफ्रिकेतला काँगो हा आणखी एक गरीब देश. काही दिवसांपूर्वी तिथे अशीच एक अफवा पसरली होती, तिथला एक डोंगर सोन्याचा आहे म्हणून! रातोरात केवळ परिसरातल्याच नव्हे, अख्ख्या देशातील अनेक लोकांनी तिथे धाव घेतली होती आणि सोन्याचा हा डोंगर फोडायला सुरुवात केली होती. काहींनी तर इथली माती चक्क गोण्यांत, पिशव्यांत, खिशातही भरून घेतली! ही माती नंतर धुऊन त्यातून सोनं बाहेर काढू म्हणून. ही गर्दी हटवायला सरकारला तिथे लष्कर पाठवावं लागलं होतं!