डिजिटल शुभमंगल! फेसबुकवर ओळख, व्हिडीओ कॉलवर प्रपोज आणि झूमवर केलं ऑनलाईन लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2021 04:22 PM2021-11-15T16:22:39+5:302021-11-15T16:23:07+5:30
Couple marry on zoom call : एका कपलच्या डिजिटल नात्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे हे दोघंही आजपर्यंत कधीच एकमेकांना भेटलेले नाहीत आणि तरीही त्यांनी एकमेकांसोबत लग्नही केलं आहे.
नवी दिल्ली - कोरोना काळात अनेक लोकांनी आपलं आयुष्य पूर्णपणे डिजिटल केलं आहे. अभ्यासापासून नोकरीपर्यंत आणि कुटुंबाच्या गाठीभेटीपासून ऑफिस मीटिंग्सपर्यंत सर्वच ऑनलाईन होऊ लागलं आहे. तसेच कोरोना काळात लोक एकमेकांना भेटूही शकत नसल्याने प्रेमही सध्या ऑनलाईनच होत आहे. याच दरम्यान आता एका अनोख्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका कपलच्या डिजिटल नात्यानं (Digital Relationship) सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे हे दोघंही आजपर्यंत कधीच एकमेकांना भेटलेले नाहीत आणि तरीही त्यांनी एकमेकांसोबत लग्नही केलं आहे. ब्रिटनच्या लँकेस्टर येथील रहिवासी असलेली 26 वर्षांची आयसी गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात खूपच कंटाळली. यामुळे तिने फ्रेंडशिप करण्यासाठीचा फेसबुक ग्रुप जॉईन केला. या ग्रुपमध्येच तिची ओळख अमेरिकेच्या डेट्रॉइटमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय डॅरिनसोबत झाली. दोघांनी चॅटिंग करण्यास सुरुवात केली आणि हळूहळू त्यांचं व्हिडीओ कॉलवरही बोलणं होऊ लागलं.
एकमेकांसोबत ऑनलाईन गप्पा मारूनच ते अगदी जवळ आले. याच वर्षी मे महिन्यात डॅरिनने आयसीला प्रपोज करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. व्हिडिओ कॉलवरच तो आपल्या गुडघ्यावर बसला आणि आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. आयसीने होकार दिला आणि नंतर तिला समजलं की डॅरिनने तिच्यासोबत बोलण्याआधीच तिच्या वडिलांसोबत याबाबत चर्चा केली होती. हे ऐकून ती आणखीच आनंदी झाली.
दोघांनी याच वर्षी झूम कॉलच्या माध्यमातून अधिकृतपणे लग्नगाठही बांधली. आतापर्यंत हे दोघं एकमेकांना प्रत्यक्षात भेटलेही नाहीत. आयसीने डॅरिनच्या चेहऱ्याप्रमाणे दिसणारं एक सॉफ्ट टॉयदेखील बनवलं आहे. यामुळे तिला वाटतं की डॅरिन तिच्या जवळच आहे. आयसीचं म्हणणं आहे, की कोरोनामुळे त्यांची भेट होत नाही. मात्र हेच चांगलं आहे. कारण जेव्हा ते एकत्र येतील तेव्हा तो क्षण साजरा करू शकतील. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.