बाबो! महिन्याला तीन लाख कमावणारे ‘बदक’; बड्या सेलिब्रेटींना देतंय टक्कर, काय आहे खास?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 05:41 AM2021-10-06T05:41:33+5:302021-10-06T05:42:06+5:30
अमेरिकन मालकीण असलेल्या या बदकाचे टिकटॉकवर जगभरातील मिळून २.७ मिलियन इतके प्रचंड ’फॉलोअर्स’ आहेत.
आजकाल आपल्या आसपासच्या अनेकांच्या पगाराची वर्षाची पॅकेज बघून आपले डोळे विस्फारत असतात. अगदी देशात नोकरी करून देखील हे लोक मुबलक पगार कमावत असतात. काही हरहुन्नरी लोक तर सोशल मीडियाच्या मदतीने देखील लाखोंची कमाई करत असतात. कोणी कुकरी शो चालवत असतो, कोणी विविध स्ट्रीट फूडची माहिती देत असतो, कोणी ऑनलाईन शिकवण्या घेत असतो तर, कोणी विविध पर्यटन स्थळांची माहिती देत असतो. मात्र अशा अनेक प्रसिद्ध ’सोशल स्टार’ ना सध्या एक बदक चांगली टक्कर देत आहे. माणसांपेक्षा देखील जास्त प्रसिद्ध असलेल्या या टिकटॉक स्टार बदकाचे वर्षाचे उत्पन्न तब्बल पन्नास हजार डॉलर्स म्हणजे अंदाजे ३७ लाख रुपये आहे.
अमेरिकन मालकीण असलेल्या या बदकाचे टिकटॉकवर जगभरातील मिळून २.७ मिलियन इतके प्रचंड ’फॉलोअर्स’ आहेत. या बदकाचे नाव Munchkin आहे, तर याच्या मालकिणीचे नाव आहे क्रिसी एलिस. Munchkin बदकाचे इंस्टाग्रामवर देखील एक खाते आहे.
Dunkin Ducks नावाने हे खाते असून, Munchkin तिथे देखील खूप लोकप्रिय आहे. Munchkin ची मालकीण क्रिसी एलिस सांगते की, पेनेसेल्वियामध्ये ‘Dunkin Donuts’ नावाची एकमेव फास्ट फूड चेन होती. या नावावरूनच तिला Munchkin च्या इंस्टाग्राम अकाउंटचे नाव सुचले. एलिसला वयाच्या १६ व्या वर्षी पासून पाळीव प्राण्यांचा अत्यंत लळा लागला होता. या काही पाळीव प्राण्यांना घेऊन ती शाळेत देखील जात असे. मात्र तिच्या या पाळीव प्राणी प्रेमाची शाळेतील सहकारी प्रचंड थट्टा उडवत असत, तिला सतत टोमणे मारत असत. या सगळ्याला कंटाळून शेवटी तिने ’Munchkin’ साठी ‘Dunkin Donuts’ हे चॅनल चालू केले.
अल्पावधीत या चॅनलला प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या चॅनेलमुळे आज एलिस महिन्याला ४,५०० डॉलर्स अर्थात ३ लाख ३० हजार रुपयांची कमाई करते. आज अमेरिकेत एखाद्या ग्रोसरी शॉपमध्ये आठवड्यातील ४० तास काम करून जेवढी कमाई होते, तेवढी एलिस या चॅनेलच्या मदतीने फक्त अर्ध्या तासात करते असा तिचा दावा आहे. तिच्या या चॅनेलला अनेक प्रायोजक मिळालेले असून, त्यांच्या जाहिराती मधून दिवसेंदिवस तिची कमाई वाढतच चालली आहे. एखाद्या वेडापायी थट्टा मस्करी झाल्याने निराश होणाऱ्या लोकांसाठी, जगाची पर्वा न करता आपल्या ध्येयाकडे कशी वाटचाल करावी, याचे एलिस हे एक आदर्श उदाहरण आहे.
प्रसाद ताम्हनकर
prasad.tamhankar@gmail.com