Viral Whale Video: व्हेल माशाने अचानक बोटीवर मारली उडी, पर्यटकांच्या हाता-पायाची हाडे तुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 01:17 PM2022-05-18T13:17:37+5:302022-05-18T13:17:52+5:30
Viral Whale Video: व्हेल माशाचे वजन 55,000 ते 66,000 पाउंड असते. इतक्या वजनाचा मासा अंगावर पडल्यानंतरही पर्यटकांचा जीव वाचणे, हे एखाद्या दैवी चमत्कारापेक्षा कमी नाही.
Viral Whale Video: समुद्रात आढळणारा व्हेल मासा(Humpback Whale) शांत स्वभावाचा असतो, पण कधी-कधी हा रौद्र रुप धारण करू शकतो. अशाच एका व्हेल माशाचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. या व्हेल माशाने अचानक एका लहान बोटीवर उडी मारली, ज्यामुळे बोटीवरील पर्यटकांची हाडे मोडली. ही धक्कादायक घटना मेक्सिकोमध्ये घडली आहे.
Muy bonito y todo pero también muy peligro... #Ballena#Topolobampopic.twitter.com/tmSKQxiNPv
— 💫 Karem 💫 (@BrujitaMerak_) May 15, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोच्या समुद्रात कॅलिफोर्निया आखातातील टोपोलोबॅम्पो बे ऑफ अहोम या भागात ही घटना घडली आहे. या भागातून पर्यटकांची बोट जात असते, यादरम्यान एक महाकाय हंपबॅक व्हेल अचानक पाण्यातून बाहेर येऊन बोटीवर पडतो. या घटनेत बोटीवरील चार पर्यटक चिरडले जातात. दुसऱ्या एका बोटीवरील पर्यटकाने हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये कॅप्चर केला.
मीडिया रिपोर्टनुसार, या बोटीतून प्रवास करणारे दोन पुरुष आणि दोन महिला पर्यटक जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत एका महिलेचा पाय मोडला तर पुरुषाच्या फासळ्या तुटल्या आणि डोक्यालाही दुखापत झाली. या घटनेत बोटीचे प्रचंड नुकसान झाले आहे.
Demasiado...
— 💫 Karem 💫 (@BrujitaMerak_) May 16, 2022
Así quedó la lancha. pic.twitter.com/2hGvtMqh8s
बोटीला घाबरुन उडी मारल्याची शक्यता
पर्यटकांची बोट व्हेलच्या अगदी जवळ गेल्याने अधिकाऱ्यांनी या घटनेसाठी बोट ऑपरेटरला जबाबदार धरले आहे. अहोममधील नागरी संरक्षण समन्वयक ओमर मेंडोझा सिल्वा यांच्या मते, बोट जवळ आल्याने व्हेल माशाला धोका जाणवला आणि त्यामुळेच त्याने उडी मारली. दरम्यान, एका हंपबॅक व्हेलचे वजन 55,000 पौंड ते 66,000 पौंड असते. टोपोलोबॅम्पो बे व्हेल पाहण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे.