पुण्याला भेट देताय? मग इथली मिसळ नक्की चाखून या.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2017 01:00 PM2017-10-12T13:00:03+5:302017-10-13T17:10:30+5:30
पुण्यात गेल्यावर मिसळ खायलाच हवी, असं अनेक खवय्ये म्हणतात.
तिखट झणझणीत तरीची मिसळ खावी तर ती पुण्यामध्येच. खरतर मिसळीसाठी कोल्हापूर फार प्रसिद्ध आहे. पण पुण्याच्या मिसळीला स्वतःची वेगळी चव असते. त्यामुळे पुण्यात गेल्यावर मिसळ खायलाच हवी, असं अनेक खवय्ये म्हणतात. चला तर पाहू पुण्यातील मिसळसाठी प्रसिद्ध असलेले काही स्टॉल्स आणि हॉटेल्स.
बेडेकर टी स्टॉल
तुम्ही नारायण पेठेत असाल तर तिकडच्या पत्र्या मारुती मंदिराजवळ असलेल्या बेडेकर टी स्टॉलला नक्की भेट द्या. तिकडची मिसळ म्हणजे लाजवाबच आहे. त्यांच्या या दुकानात फक्त मिसळ खाण्यासाठीच दिवस-रात्र गर्दी असते.
मस्ती मिसळ
कोथरुडच्या बस स्थानकाजवळ एक छोटेखानी मस्ती मिसळ नावाचं हॉटेल आहे. तिखट-झणझणीत मिसळसाठी येथे नेहमीच गर्दी असते. तुम्हीही एकदा नक्की भेट द्या.
श्री कृष्ण भवन
बुधवार पेठेतील लक्ष्मी रोडवरील तुळशी बागेत असलेलं श्री कृष्ण भवन मिसळ खवय्यांसाठी फार प्रसिद्ध आहे. तुळशी बाग तुम्हाला माहित असेलच. त्यामुळे तेथून फेरफटका मारताना खवय्ये मंडळी या श्री कृष्ण भवनात गेल्याशिवाय राहत नाहीत.
विद्या उपहार गृह
बुधवार पेठ रस्त्यावर मिसळसाठी प्रसिद्ध असलेलं हे दुसरं हॉटेल. बुधवार पेठेत गर्दी असतेच. त्यामुळे या हॉटेलमध्येही गर्दी पाहायला मिळते.
हॉटेल रामनाथ
टिळक रोडवरील दुर्वांकूरच्या मागे असलेले हॉटेल रामनाथमधील मिसळ तुम्ही एकदा चाखून बघायलाच हवी.
श्री कला स्नॅक्स
पुण्यातील रस्ता पेठेवर असलेल्या व्यंकटेश्वर हाऊसमधील हे श्री कला स्नॅक्स मिसळसाधी फार प्रसिद्ध आहे.
खासबाग मिसळ
बाणेर-औंध लिंक रोडवरील खासबाग मिसळमधील मिसळ तुम्ही एकदा जाऊन चाखाच. तिखट-झणझणीत मिसळसाठी खासबाग मिसळ हॉटेल पुणेकरांसाठी फार प्रसिद्ध आहे.
काटा किर्र
झणझणीत तर्रीसोबत मिळणारी काटा किर्रमधील मिसळ लाजवाब लागते. शिवाय या हॉटेलच्या नावातच इतका दम आहे की नवखेही येथील मिसळ चाखल्याशिवाय पुढे जात नाहीत. डेक्कन जिमखान्याजवळ हे हॉटेल आहे.
नेवाळे मिसळ
चिंचवडच्या मस्जिदीमागे असलेल्या नेवाळे मिसळ हॉटेलची मिसळ खाण्यासाठी म्हणे दुरवरुन खवय्ये येतात.