ओ माय गॉड! 90 हजारांच्या स्कूटीसाठी 1.12 कोटींचा VVIP नंबर, हिमाचल प्रदेशातील प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 09:50 PM2023-02-16T21:50:56+5:302023-02-16T21:51:03+5:30
VVIP Number plate: हिमाचलमध्ये VVIP नंबरसाठी कोट्यवधी रुपये मोजण्यात आले, जाणून घ्या नंबर काय आहे..?
Most expensive scooter number: आपली कार किंवा बाईक इतरांपेक्षा वेगळी बनवण्यासाठी काही लोक त्यात बदल करतात, तर काही व्हीआयपी नंबर ठेवण्यास प्राधान्य देतात. पण काही वेळा लोक आपली हौस भागवण्यासाठी इतके पैसे खर्च करतात, की ते ऐकल्यावर कोणाचाही विश्वास बसत नाही. हिमाचल प्रदेशातही असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका स्कूटीच्या व्हीव्हीआयपी क्रमांकासाठी 1 कोटींहून अधिक बोली लावण्यात आली. हिमाचल प्रदेशच्या इतिहासात पहिल्यांदाच स्कूटी मालक दुचाकीसाठी एवढ्या मोठ्या रकमेत नंबर खरेदी करण्यास तयार आहे.
हे प्रकरण शिमल्यातील कोटखाईचे आहे, जिथे विभागाने दुचाकींसाठी व्हीव्हीआयपी क्रमांक (HP99-9999) साठी ऑनलाइन बोली लावली होती. या क्रमांकाची किमान किंमत 1,000 रुपये निश्चित करण्यात आली असून एकूण 26 जणांनी त्यासाठी बोली लावली. दुपारी 1.30 वाजेपर्यंत बोली सुरू होती, मात्र बोली 1,12,15,500 रुपयांपर्यंत वाढत गेली. ही बोली पाहून सर्वांनाच धक्का बसला.
बिडिंगची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि युजर्सनी त्यावर आपली प्रतिक्रिया दिली. एका युजरने असा अंदाज लावला की, बोली लावणाऱ्याला या वर्षी सफरचंदाचा हंगाम चांगला गेला असावा. दुसर्या युजरने बोलीच्या रकमेवर आश्चर्य व्यक्त केले आणि सुचवले की बोली लावणार्याने नंतर नंबर खरेदी करण्यास नकार दिल्यास दंड केला पाहिजे. तसेच, निविदाधारकांच्या निधीचा स्रोत तपासला पाहिजे.