प्रशासनाला जे जमलं नाही, ते वाघानं करून दाखवलं; दोन गावं झाली एका झटक्यात हागणदारीमुक्त...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2019 01:30 AM2019-12-01T01:30:54+5:302019-12-01T01:31:21+5:30
आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भीतीनं लोक शौचालयांचा वापर करू लागलेत, हीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे.
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंडच्या महोबा आणि हमीरपूर जिल्ह्यांच्या सीमेवर वाघ शिरलाय. त्यामुळे वाघाच्या भीतीने या गावांमधील लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद झालं आहे. या गावांमध्ये सरकारने शौचालयेही बांधून दिली आहेत. तरीसुद्धा गावकरी बाहेर नैसर्गिक विधीसाठी जात होते. पण आता गावात अचानक एक वाघ शिरल्याने लोकांचं बाहेर जाणं बंद झालं आणि ते घरातील शौचालयांचा वापर करू लागले आहेत. हा वाघ मध्य प्रदेशातील पन्ना जंगलातून भटकून इथपर्यंत पोहोचल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं आहे.
येथील वन विभागाचे अधिकारी रामजी राय यांनी सांगितले, कुनेहटा गावातील एका व्यक्तीनं शेतात वाघ बघितल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे वन विभागानं एक टीम वाघ पकडण्यासाठी तैनात केली आहे. आता सुरक्षा म्हणून लोकांना आग पेटवून सतर्क राहण्याचा सूचना करण्यात आली आहे.
आतापर्यंत वाघाला पकडण्यात यश आलं नाही. पण निदान या वाघाच्या भीतीनं लोक शौचालयांचा वापर करू लागलेत, हीसुद्धा एक चांगली गोष्ट आहे. वाघ जंगलात असूनही लोक घरात लपून बसत आहेत. कुणीही बाहेर शौचास जात नाही. गेल्या चार दिवसांपासून लोक असंच करीत आहेत. त्यामुळेच गमतीत या वाघाला हागणदारीमुक्त योजनेचे ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणत आहेत.
देशातील गावांना
हागणदारीमुक्त करण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. पण अजूनही लोक बाहेर शौचास जातात. म्हणजे अनेक ठिकाणी प्रशासन लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद करू शकलेलं नाही. लोकांचीही बाहेर जाण्याची सवय सुटत नाहीये. पण हेच प्रशासनाचं काम एका वाघानं केलं आहे. वाघानं लोकांचं बाहेर शौचास जाणं बंद केलंय.