हौसेला मोल नाही! अवघ्या 6 हजारांत थेट चंद्रावर खरेदी केली 1 एकर जमीन; अशी केली भन्नाट 'डील'
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 09:59 AM2022-02-21T09:59:24+5:302022-02-21T10:10:02+5:30
One Acre Land On Moon : चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा अनेकांनी कधीतरी मनोमन विचार देखील केला असेल. पण आता एका हौशी व्यक्तीने थेट चंद्रावरच जमीन विकत घेतली आहे.
नवी दिल्ली - काही लोक हौसेसाठी काहीही करतात. म्हणूनच हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. ग्रह-तारे हे सर्वांनाच खुणावत असतात. चंद्रावर जमीन खरेदी करण्याचा अनेकांनी कधीतरी मनोमन विचार देखील केला असेल. पण आता त्रिपुरामध्ये एका हौशी व्यक्तीने थेट चंद्रावरच (Moon) जमीन विकत घेतली आहे. एका प्राध्यापकाने अवघ्या सहा हजार रुपयात चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे. न्यूज 18 च्या रिपोर्टनुसार, प्राध्यापकाने चंद्रावरची एक एकर जमीन खरेदी करून ती स्वतःच स्वतःला व्हॅलेटाईन गिफ्ट दिली आहे.
जमीन खरेदी करणाऱ्या या त्रिपुरातील प्राध्यापकाचं नाव सुमन देबनाथ असं आहे. सुमन गणिताचे प्राध्यापक आहेत. एका खासही क्लासमध्ये ते शिकवतात. त्यांच्या दाव्यानुसार त्यांनी चंद्रावर एक एकर जमीन खरेदी केली आहे. या जमीन खरेदीचे सगळे कागदपत्रही लवकरच त्यांना मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सहा हजार रुपयांत चंद्रावर जमीन खरेदी कशी केली, याचा अनुभव देखील सुमन यांनी शेअर केला आहे. या सहा हजार रुपयांमध्ये शिपिंग आणि पीडीएफ चार्जदेखील घेण्यात आला आहे. एका इंटरनॅशनल लूनर सोसायटीच्या माध्यमातून त्यांनी चंद्रावरील ही जमीन खरेदीची प्रक्रिया केल्याचं म्हटलं आहे.
चंद्रावरची जमीन ही पृथ्वीच्या तुलनेत खूपच स्वस्त
इंटरनॅशनल लूनर सोसायटी चंद्रावरील जमीन खरेदीसंबंधी करार करते. त्यांच्या माध्यमातून सुमन देबनाथ यांनी ही चंद्रावरील जमिनीची डील केली. सुमन देबनाथ यांच्या ओळखीच्या आणखी एका व्यक्तीनंही अशाप्रकारे जमीन घेतल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानंतर सुमन यांनीही जमीन खरेदी केली आहे. देबनाथ यांनी म्हटलंय की अनेक सेलिब्रिटिंनीही चंद्रावर जमीन घेऊन ठेवली आहे. याचं त्यांना फार कुतूहल होतं. म्हणून त्यांनाही चंद्रावरील जमीन खरेदीचा मोह आवरला नाही. चंद्रावरची जमीन ही पृथ्वीच्या तुलनेत खूपच स्वस्त आहे. पण चंद्रावर जमीन खरेदी करुन तिथं घर बांधण्याचा कोणताही विचार नाही असं म्हटलं आहे. सुमन यांच्या आई-वडिलांनाही आपल्या मुलाने चंद्रावर जमीन घेतल्याचं कौतुक वाटतं असल्याचं सुमन यांनी सांगितलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. सूरतमधील एका व्यापाऱ्याने आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकल्यासाठी चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. विजयभाई कथीरिया असं जमीन विकत घेणाऱ्या व्यापाऱ्याचं नाव आहे. कथीरिया यांनी आपल्या दोन महिन्याच्या मुलाचं नाव नित्या ठेवलं असून नुकतंच त्यांनी त्याच्यासाठी थेट चंद्रावर जमीन विकत घेतली आहे. यासाठी त्यांनी न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल लूनर रजिस्ट्रीमध्ये एक मेल पाठवला होता. यावर त्यांना 13 मार्चला अप्रूवल मिळालं. यानंतर त्यांनी आपले सर्व गरजेचे कागदपत्रही तिथे पाठवले. त्यांच्या कुटुंबाला मुलाच्या नावाच्या कंपनीचं एक प्रमाणपत्रही मिळालं आहे.