सावधान : आता "व्हॉट्सअॅप"च्या माध्यमातून व्हायरस
By admin | Published: May 17, 2017 04:26 PM2017-05-17T16:26:27+5:302017-05-17T16:32:07+5:30
वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे
अनिल भापकर/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - वन्नाक्राय या रॅन्समवेअर व्हायरसने अक्षरश: धुमाकूळ घातला असतानाच आता जगभरात 56 कोटी युझर्स वैयक्तिक इमेल आणि पासवर्ड लीक झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. म्हणजेच हॅकर आता वेगवेगळ्या माध्यमातून तसेच व्हायरसचे हल्ले करीत आहे.आता तर या हॅकर्स ने व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून व्हायरस पसरविण्यास सुरुवात केली आहे. सध्या एक लिंक व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून सगळीकडे व्हायरल होत आहे ते म्हणजे या लिंक वर क्लिक करून व्हॉट्सअॅपचा कलर बदलता येतो.
या संबंधीची अधिक माहिती अशी की मागील काही दिवसांपासून व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून एक मेसेज सगळीकडे फिरत आहे तो मेसेज म्हणजे जर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप अधिक कलर फुल्ल करायचे असेल अर्थात तुमच्या व्हॉट्सअॅप अप्लिकेशन चा कलर चेंज करायचा असेल तर खालील लिंक वर क्लिक करा असा मेसेज असतो. जर ह्या लिंक वर क्लिक केले तर तुम्हाला व्हॉट्सअॅपच्या ऑफिसिअल साईटवर घेऊन जाण्याऐवजी दुसऱ्याच डोमेन वर ही लिंक घेऊन जाते. नंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी ही लिंक तुमचे व्हॉट्सअॅप फ्रेंड आणि व्हॉट्सअॅप ग्रुप मध्ये शेअर करण्यास सांगितले जाते.ही फेक व्हॉट्सअॅप लिंक म्हणजे दुसरे तिसरे काही नसून मॅलवेअर चा प्रकार असून जो तुमचा डेटा चोरण्याचे काम करतो. जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या फेक लिंक वर क्लिक करता तेव्हा एक छोटासा प्रोग्राम तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टॉल होतो जो डेटा चोरून तो डेटा हॅकर कडे पाठविण्याचे काम करतो त्यालाच मॅलवेअर असे म्हणतात.
काय काळजी घ्यावी ?
१. सगळ्यात महतवाचे म्हणजे व्हॉट्सअॅप कधीच अशा प्रकारचे मेसेज आपल्या युझर्सला पाठवत नाही कारण व्हॉट्सअॅपचे अपडेट हे गुगल प्ले किंवा अँपल स्टोअर मार्फत मिळतात.
२. कुठल्याही अनोळखी लिंक ला क्लिक करू नका जे सांगतात कि या मध्ये व्हॉट्सअॅप अपडेट उपलब्ध आहेत.
३. अनोळखी मित्राने जर काही व्हिडिओ किंवा लिंक पाठविले असल्यास ओपन करू नका . अथवा शक्य असल्यास कॉल करून लिंक कसली आहे याविषयी खातरजमा करा.
४.तुमच्या कडे जर चुकून अशी लिंक आलीच तर तुम्ही ती पुढे फॉरवर्ड करू नका.
५. तुमच्या स्मार्टफोन मध्ये एखादा चांगला अँटीव्हायरस असावा .