कोण कुणाचा नवरा, कोण कुणाची बायको!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2022 08:30 AM2022-02-24T08:30:35+5:302022-02-24T08:30:56+5:30
जुळ्या भावंडांचा आणि बहिणींचा तसंच त्यांच्या मुलांचा असाच एक किस्सा सध्या अमेरिकेत खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
जुळ्या भावंडांबद्दल प्रत्येकाला नेहमी आकर्षण असतं. बॉलिवूडमध्ये तर जुळ्या भावा-बहिणींवर कितीतरी चित्रपट येऊन गेले, पण तरीही त्यांची क्रेज अजूनही संपलेली नाही. लोकांची पावलं आपोआपच या चित्रपटांकडे वळतात. जुळ्या भावंडांचा आणि बहिणींचा तसंच त्यांच्या मुलांचा असाच एक किस्सा सध्या अमेरिकेत खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो आणि व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहेत.
अमेरिकेतील व्हर्जिनिया येथे राहणाऱ्या ब्रिटनी आणि ब्रायना या दोन्ही सख्ख्या जुळ्या बहिणी. दोघीही दिसायला एकदम सारख्या आहेत. एवढंच नव्हे, त्यांच्या सवयी आणि आवडी - निवडीही अगदी सारख्या आहेत. एकीला जे आवडतं, तेच दुसरीला आवडतं. त्यामुळे लहानपणापासून त्यांच्या पालकांना सगळ्या गोष्टी सारख्याच घ्याव्या लागायच्या, शिवाय प्रत्येक वस्तूचे दोन दोन जोड. सारखेच ड्रेस, सारखेच बूट, सारखेच सँडल, तसंच खाणं... एकीला चॉकलेट आवडतं, तर दुसरीलाही तेच, त्याच ब्रॅण्डचं चॉकलेट. इतक्या त्यांच्या आवडी - निवडी सारख्या. त्यामुळे फक्त एकाच शाळेत त्या शिकल्या नाहीत, तर एकाच वर्गात होत्या. मोठ्या झाल्यावर दोघींनी लॉचं शिक्षण घेतलं आणि आताही दोघी बहिणी एका लॉ फर्ममध्ये वकील म्हणून काम करीत आहेत. त्यांचं इतकं सेम असणं लोकांनाच काय, त्यांच्या पालकांनाही आजवर बुचकळ्यात टाकत आलं आहे.
पण, ही गोष्ट इथेच संपत नाही. २०१७मध्ये या दोघी बहिणी ट्विन्सबर्ग येथे एका मेळाव्यात गेल्या होत्या. हा मेळावाही होता जुळ्यांचाच. येथे जगभरातून जुळे लोक आले होते. एकसारखेच दिसणारे आणि एकाच पेहरावातले. इतके सारे जुळे पाहून संयोजकांचीही पंचाईत झाली होती. कारण त्यांना नावानं ओळखणंच अवघड होत होतं. त्यात यातील काही लोकांनी ‘मीच तो’ म्हणून संयोजकांसह आयोजकांची करमणूकही केली. अर्थात नंतर त्यांनी कबूलही केलं, ‘तो मी नव्हेच’! याच मेळाव्यात या दोघा जुळ्या बहिणींना भेटले जुळे भाऊ. ब्रिटनी आणि ब्रायना यांच्यात जसं तंतोतंत साम्य होतं, तसंच जेम्स आणि जेर्मी या दोन्ही भावांमध्येही. त्यांची आवड - निवडही सारखीच होती. एवढंच नाही, या चौघांची वयंही साधारण सारखीच होती. प्रथमदर्शनीच या चौघांमध्ये दोस्ती झाली. या दोस्तीचं रूपांतर प्रेमात होत गेलं आणि सहा महिन्यांनी या भावंडांनी ब्रिटनी आणि ब्रायना यांना थेट लग्नाची मागणीच घातली. अर्थात त्यांच्याकडूनही नकाराचा प्रश्नच नव्हता. दोघींनीही तत्काळ लग्नाला संमती दिली आणि त्यांचं लग्न झालं... ब्रिटनीनं जेम्सशी लग्न केलं आणि ब्रायनानं जेर्मीशी.
आता इथे तरी हे साम्य थांबावं की नाही?... पण नाही... दोघीही बहिणी एकाचवेळी गर्भवती झाल्या आणि एकाच सुमारास त्यांना मुलंही झाली. हे दोन्हीही मुलगेच होते. ही मुलंही एकदम सेम. जणू जुळी भावंडंच असावीत! दोघी बहिणी गर्भवती झाल्यावर आणि मुलं झाल्यावर आपापल्या नवऱ्यांसह आणि मुलांसह त्यांनी सोशल मीडियावर आपले फोटोही पोस्ट केले. त्यातही त्यांनी गंमत केली आणि लोकांना विचारलं, सांगा, यातली ब्रिटनी कोण आणि ब्रायना कोण? जेम्स कोण आणि जेर्मी कोण? कोण, कोणाचा नवरा आहे, कोण कोणाची बायको आहे आणि कोणत्या जोडप्याचा मुलगा कोणता?...
र्थातच इतक्या जटील कोड्याचं उत्तर कोणालाच देता आलं नाही. ज्या कोणी या जोड्या जुळवायचा प्रयत्न केला, ते सपशेल चुकले! याआधी १२ फेब्रुवारी रोजी या दोन्ही जोडप्यांनी एक कोलाज सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात या चौघांसह ब्रिटनीचं काही दिवसांचं छोटं बाळही होतं आणि दिवस भरलेली गर्भवती ब्रायनाही दिसत होती.
हा फोटो शेअर करून त्यांनी लोकांना विचारलं होतं, सांगा, ब्रायनाला मुलगा होईल की मुलगी? ब्रिटनीच्या बाळाचं नाव आम्ही जेट ठेवलं आहे. होणाऱ्या बाळाचं नावही तुम्ही सुचवा... हे नाव मात्र सर्वांच्या नावाशी जुळलं पाहिजे... यावरही लोकांनी बाळाची शेकडो नावं सुचवली होती. त्यांनी नेमकं कोणतं नाव निवडलं, हे लगेच जाहीर केलं नाही, पण नाव पाठवणाऱ्या सगळ्या लोकांचे आभार मानले. दुसऱ्या बाळासाठी आम्ही आणि निसर्गही आता फार काळ वाट पाहू शकणार नाही, असा दावा केला आणि काही तासांतच ब्रायनाला बाळ झालं...
दोन आया आणि दोन बाप!
या जुळ्यांची ही गोष्ट अजूनही संपलेली नाही. या दोन्ही जुळ्या बहिणी, त्यांचे जुळे नवरे आणि त्यांना झालेली मुलं एकाच घरात राहतात. एकाच घरात राहणारे सहा जुळे हे कदाचित पहिलंच उदाहरण आहे. पण हे सारे जुळे अतिशय आनंदी आहेत. इश्वरानंच आमच्या जोड्या जुळवल्या आणि आम्हाला ‘जुळी’ मुलं दिली, असं त्यांचं म्हणणं आहे. जेनेटिकली ही मुलं जुळी नसली तरी ‘टेक्निकली’ त्यांना जुळं म्हटलं जात आहे. या सर्वांचं एकमेकांवर अतिशय प्रेम आहे. त्यामुळे यातलं आणखी एक जगावेगळं आश्चर्य म्हणजे या मुलांना दोन आया आणि दोन वडील जन्मत:च मिळाले आहेत!...