महिला मागे सोडून गेली एक बंगला अन् कोट्यावधी रूपयांची संपत्ती, मृत्यूपत्रात ठेवली एक अट
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:58 PM2023-06-23T14:58:54+5:302023-06-23T14:59:31+5:30
नॅन्सी सॉयरल नावाच्या या महिलेने आपली संपत्ती सांभाळण्यासाठी आधीच व्यवस्था केली होती. तिने तिच्या मृत्यूपत्रात असं काही लिहिलं होतं की, तिची प्रॉपर्टी कुणालाही मिळू शकत नव्हती.
Woman leaves substantial inheritance: अमेरिकेच्या फ्लोरिडामधून एक अजब घटना समोर आली आहे. इथे राहणारी एक महिला तिच्या कोट्यावधी रूपयांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी एका व्यक्तीचा शोध घेत आहे. या महिलेला जवळचा किंवा दूरचा कुणीही नातेवाईक नाही. तिला काही मित्र होते, पण तिला त्यांना आपली संपत्ती सोपवायची नाही. 84 वर्षीय या महिलेचं काही दिवसांआधी निधन झालं. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात आणि मग कोर्टात पोहोचलं.
नॅन्सी सॉयरल नावाच्या या महिलेने आपली संपत्ती सांभाळण्यासाठी आधीच व्यवस्था केली होती. तिने तिच्या मृत्यूपत्रात असं काही लिहिलं होतं की, तिची प्रॉपर्टी कुणालाही मिळू शकत नव्हती.
एका रिपोर्टनुसार, नॅन्सी तिच्या मागे साधारण 20 कोटी रूपयांपेक्षा जास्तीची संपत्ती सोडून गेली आहे. आपल्या मृत्यूपत्रात तिने अट ठेवली की, जो तिच्या सात मांजरी क्लियोपेट्रा, गोल्डफिंगर, लियो, मिडनाइट, नेपोलियन, स्नोबॉल आणि स्क्वीकी यांचा चांगला सांभाळ करेल तोच तिच्या संपत्तीचा मालक होऊ शकतो.
ही केस सांभाळणाऱ्या वकिलांनुसार, नॅन्सने लिहिलं की, तिच्या मांजरींना तिचं घर टाम्पा हाऊसमध्ये मरेपर्यंत ठेवावं लागेल. कारण त्या दुसरीकडे गेल्यातर नीट राहणार नाहीत. याच अटीमुळे कुणीही हे घर खरेदी करत नाहीये. म्हणजे जोपर्यंत मांजरी जिवंत आहेत तोपर्यंत घराचा ताबा कुणालाच मिळणार नाही.
एका अधिकाऱ्यानुसार, नॅन्सीने तिच्या मांजरींचा जीवनभराचा खर्चही वेगळा ठेवून गेली आहे. जेणेकरून त्यांची उपासमार होऊ नये. ही फारच वेगळी घटना आहे. नॅन्सीच्या मृत्यूनंतर मांजरी काही दिवस एकट्या राहिल्या. केस कोर्टात गेल्यावर कोर्टाने आदेश दिला की, मांजरींना अशा ठिकाणी नेलं जावं जिथे त्यांची देखरेख व्यवस्थित होईल.
केसच्या सुनावणी दरम्यान सांगण्यात आलं की, इतक्या मोठ्या घरात मांजरींना एकटं सोडता येणार नाही. नॅन्सीच्या मृत्यू पत्रातील अटी कठिण आहेत. पण मांजरींची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासाठी योग्य व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. काही रिपोर्ट्सनुसार, मांजरींना लवकर दत्तक दिलं जाईल.