...अन् 'ति'ला 32 वर्षांनी सापडला लग्नाचा ड्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 08:09 PM2018-02-13T20:09:37+5:302018-02-13T20:15:02+5:30
आईच्या लग्नाचा ड्रेस पाहण्यासाठी तिने शोधाशोध केली. तेव्हा एका बॅगमध्ये तिला लग्नाचा ड्रेस मिळाला पण तो आपल्या आईचा ड्रेस नाहीये याबाबत तिचं ठाम मत होतं...
सोशल मीडियामध्ये किती ताकद आहे याची कल्पना आता सर्वांनाच आली आहे. क्षणार्धात एखादी पोस्ट व्हायरल होते आणि जगभरात त्याबाबत चर्चा सुरू होते. सोशल मीडियाची हीच ताकद सिद्ध करणारी आणखी एक अनोखी घटना घडली आहे. एका महिलेला तब्बल 32 वर्षांनंतर तिने स्वतःच्या लग्नात घातलेला ड्रेस परत मिळाला आहे.
अमेरिकेच्या ओहियो प्रांतातील ही घटना आहे. 4 फेब्रुवारी रोजी अॅमे बार्टलबाग (Ame Bartlebaugh) या तरूणीने तिच्या आईच्या लग्नाचा ड्रेस पाहण्यासाठी शोधाशोध केली. तेव्हा एका बॅगमध्ये तिला लग्नाचा ड्रेस मिळाला पण तो आपल्या आईचा ड्रेस नाही अशी तिची खात्री झाली. ज्या कोणा व्यक्तीचा हा ड्रेस असेल त्यांना तो परत मिळावा यासाठी अॅमेने या घटनेबाबत फेसबुकवर पोस्ट केले आणि 24 तासांच्या आत ओहियोच्या मिशेल हार्विल यांना 1985 पासून त्यांचा हरवलेला लग्नाचा ड्रेस मिळाला. 32 वर्षानंतर सापडलेला ड्रेस पाहून काय प्रतिक्रिया द्यावी हेच त्यांना समजत नव्हतं.
दुसरीकडे, मिशेल यांच्याकडे आपल्या आईचा ड्रेस असेल अशी अपेक्षा अॅमे बार्टलबागला होती, पण तिची अपेक्षा फोल ठरली. कारण मिशेल यांच्याकडे भलताच कोणाचा तरी ड्रेस होता. त्यामुळे किमान पुढील वर्षी माझ्या लग्नाच्या आधीतरी माझ्या आईचा हरवलेला लग्नाचा ड्रेस मिळेल अशी आशा निराश झालेल्या अॅमे बार्टलबागने व्यक्त केली आहे.
हा सर्व प्रकार ड्राय क्लिनरने केलेल्या घोळामुळे झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याने ड्राय क्लिनिंग झाल्यावर दुस-याच बॅगमध्ये ड्रेस पॅक करून पार्सल पाठवले होते.